मुंबई, 5 मे : मुंबई-पुणे यांसारख्या मोठा शहरानंतर आता नवी मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नवी मुंबईत सोमवारी 34 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा गेला 348 वर पोहोचला आहे. यासोबतच नवी मुंबईतून एक चिंताजनक बातमी आली आहे. कारण नवी मुंबईतील ज्या एपीएमसी मार्केटमधून मुंबईसारख्या महानगराला भाजीपाल्याचा पुरवठा होतो, तिथं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
वाशी येथील एपीएमसी मधील निकटवर्तीय नवे 6 रुग्ण आढळले असून इथल्या एकूण रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. अनेक व्यापारी एपीएमसी मार्केटमधून भाजीपाला खरेदी करतात आणि मुंबईतील विविध भागात नेवून विकतात. याच एपीएमसीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईत लॉकडाऊन काळात कुठलीही शिथिलता देण्यात आली नाही. नवी मुंबई पालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दारूचे दुकान आणि खासगी कंपन्या सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार
नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर सोमवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही अंशी लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर मुंबईकडे येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. पनवेल, नवी मुंबईहून लोकं मुंबईकडे निघाल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या टप्प्यात नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.