कोरोनाचं निमित्त पण राजकीय खुन्नस जुनीच! सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप आमनेसामने

कोरोनाचं निमित्त पण राजकीय खुन्नस जुनीच! सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप आमनेसामने

कोरोनाच्या निमित्तानं राज्य सरकार विरोधात भाजप अशी लढाई राज्यात सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ असल्याचं सिद्ध झाल्याची टीका करत भारतीय जनता पक्षाने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन आज (22 मे) पुकारलं आहे. यात 'माझं अंगण रणांगण' अशी घोषणा देत पक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेरच फलक, काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध करावा, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे.

आतापर्यंत भाजपनं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता संदर्भात पहिल्यांदाच पक्षानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात सहभागी होतील. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर मधून हे आंदोलन करतील.

हेही वाचा.. आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?', आता काढायचे 'महाराष्ट्र बचाव'चे गळे

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या चाचण्या पुरेशा संख्येनं होत नसल्याची टीका केली होती. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. अशावेळी विशेषता मुंबईसारख्या शहरांमध्ये दररोज किमान दहा हजार चाचण्या झाल्या पाहिजेत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईसारख्या शहरात सध्या रोज साडेतीन ते चार हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं आजच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे तंत्रविद्या करतात तेच काळे कपडे घालतात अशी बोचरी टीका काल केली होती. त्यासोबतच कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार बरखास्त करा अशी भाजपची भूमिका असेल, तर पहिले गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश ही राज्य सरकारं बरखास्त करावीत आणि त्यानंतरच महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची भाषा करावी अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली होती.

इतकंच नाही तर आजच्या सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी देखील भाजपच्या या आंदोलनावर टीका केली आहे. “महाराष्ट्र प्रकाशमान तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झालेले आहे. डोमकावळ्यांचे फडफडणे औट घटकेचे ठरेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील फडणवीसांनी भाग राखून वागावे बोलावे. शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?” असा सवाल आजच्या सामनातून विचारलेला आहे.

हेही वाचा.. जमावबंदी कायद्याची ऐसी तैसी! परळीत भाजप आमदारासह 22 जणांवर गुन्हा दाखल

तसंच भाजपचं आंदोलन असताना त्याला छेद देण्यासाठी आजच्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनं 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' हे अभियान सुरु केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील पाच लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या निमित्तानं राज्य सरकार विरोधात भाजप अशी लढाई राज्यात सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

First published: May 22, 2020, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading