Home /News /mumbai /

Big News : महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर हादरा! ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

Big News : महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर हादरा! ठाकरे सरकार कोसळलं, अखेर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घातली.

    मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला होता. त्यानंतर मात्र शिवसेनेचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्याय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. शेवटी आज (Chief Minister Uddhav Thackeray Facebook live) उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची (Chief Minister Uddhav Thackeray resigns) घोषणा केली. हे वृत्त अनेकांना धक्का देणारं आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांचा राजीनामा देखील मान्य केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी तो राजीनामा लगेच मान्यही केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government Collapse) गेल्या आठ दिवसांच्या राजकीय चढाओढीनंतर अखेर कोसळलं आहे. "गुळाच्या ढेपेला मुंगळा चिपकून बसतो, तसा मी चिपकून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं. "शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? मी आपल्याशी संवाद साधून आश्वास्त केलं होतं. असो हा फार पूर्वीचा किस्सा आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत अतिशय चांगल्यापद्धतीने कार्यभार झाला. छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देवून सरकार म्हणून काम सुरु केलं. हा एक योगायोग होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आपण विसरणार नाहीत हे माहिती आहे. आयुष्य सार्थकी झालं, अशी माझी भावना आहे. औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर नाव दिलं आहे. तर उस्मानाबादचं धारावीश नाव दिलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण करत आलो आहोत. एखादी गोष्ट चांगली असली की त्याला दृष्ट लागते, असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. आजच्या बैठकीत शिवसेनेचे फक्त चार मंत्री होते. औरंगाबादच्या नामकरणाचा ठराव मांडला तेव्हा दोन्ही पक्षांनी विरोध केला नाही. त्यांचे विशेष आभार मानतो. ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले. शिवसेनेला 56 वर्षे झाली. लहानपणापासून शिवसेना काय आहे हे फक्त बघत नाही तर अनुभवत आलो. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षा चालक ते वॉचमेन अनेकांना मंत्री केलं. माणसं मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं ते विसरायला लागले. जे जे देता येईल ते सर्व दिलं तरी ते लोकं नाराज. मी मातोश्रीला आल्यानंतर अनेक लोक येत आहेत ते लढा, आम्ही सोबत आहोत, असं सांगत आहेत. ज्यांना नाही दिलं ते हिंमतीने सोबत आहेत. हेच खरे शिवसैनिक! याच नात्याच्या जोरावर शिवसेना उभी राहिली. शिवसेनेने अनेक आव्हानं झेलली. न्यायदेवतेचा निकाल मानला पाहिजे. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याचा आदेश पालन करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्यपालांचे आभार. त्यांनी 24 तासाच्या आत आम्हाला फ्लोर टेस्टचे आदेश दिले. तसेच विधान परिषदेच्या 12 सदस्यांची यादी लटकून राहिली आहे ते घोषित करावी, ही विनंती. (उद्या बहुमत चाचणी होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल) जे दगा देणार ते असे सांगत होते ते सोबत आहेत. अशोक चव्हाण म्हणाले की आपल्या लोकांना सांगा आम्ही बाहेर पडतो. बाहेरुन पाठिंबा देतो. तुमची नाराजी आहे तरी कोणावर? मी काय करु? आपली नाराजी सुरत किंवा गुवाहाटीला जावून बोलण्यापेक्षा आताच सांगा. तुमच्या भावनांचा मी आदर करतोय. पण समोर येवून बोला. मला या भानगडीत बोलायचं नाही. शिवसैनिकांनी तुम्हाला आपलं मानलं होतं. मुंबईत आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनेक शिवसैनिकांना नोटीस देण्यात आली आहे. कशासाठी? मला खरंच लाज वाटतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? एवढी माणुसकी मेली. मी शिवसैनिकांना आवाहन करतो, कुणीही मध्ये येऊ नका. उद्या लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे. शिवसैनिकांनी रस्त्यामध्ये येवू नये. या आणि शप्पथ घ्या. उद्या फ्लोर टेस्ट आहे. महाविकास आघाडीकडे किती आमदार आहेत? मला यामध्ये रस नाही. मी यापूर्वीच सांगितलं आहे. माझ्या विरोधात कोण आहेत यात रस नाही. पण माझ्याविरोधात एक जरी माझा माणूस असला तर मला ते नको. मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रामाणिकणाने वाटतं ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांना मु्ख्यमंत्रीपदावरुन उतरवण्याचं पुण्य त्यांच्या नशिबात येत असेल ते येऊ द्या. कुणी अडवू नका. त्यांचा आनंद हिसकावून घेऊ नका, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून राजीनाम्याची आधीच पूर्वकल्पना दरम्यान, 22 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांना कायदेशीर बाबी करण्यात रस नव्हता. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आजही कॅबिनेट बैठकीपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी उद्धव ठाकरेंना कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असं सांगितलं होतं. मात्र पक्षात फूट पडल्यानं उद्धव ठाकरे नाराज झाले होते. आज सकाळी त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाला मानसिक आवाहन करणारं पत्रही लिहिलं होतं. यात त्यांनी सर्व शिवसैनिकांनी परता असं नमूद केलं होतं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Udhhav Thakeray

    पुढील बातम्या