मुंबई, 16 जून : ‘अजितदादा हे कार्यक्षम नेते आहे. त्यांनी युतीत यावं. त्यांच्या कामाचा जनतेला फायदा व्हावा’ असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी थेट ऑफरच दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. पण आता पुन्हा एकदा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना युतीत येण्याची ऑफर देऊन नवा विषय छेडला आहे. ‘अजित पवारांबद्दल मला आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. दादा जेव्हा बोलतात तेव्हा जनता त्याला गांभीर्याने घेते. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे, अशा शब्दांत दीपक केसरकरांनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळत सरकारमध्ये येण्यासाठी ऑफर दिली आहे.
‘दंगली करणारे सत्तेवर बसल्यावर दंगली होणार च नाही. कोल्हापूर येथील झालेल्या दंगलीमध्ये शहरातील एकही मनुष्य दगड मारायला नव्हता. ही सर्व लोक बाहेरून आलेली होती. दंगली होणार आहे हे अगोदर नेत्यांना कसं काय समजत. तुम्ही भडकवणार आणि आमच्यावर आरोप करणार हे चालणार नाही, असंही केसरकरांनी ठणकावून सांगितलं. (कर्नाटकने अभ्यासक्रम बदलला, भाजपच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; फडणवीस म्हणाले, आता….) ‘जबाबदार नेते त्यांनी अशी विधानं करायला नकोय. संजय राऊतांसारखे लोक रोज बोलतात आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. संजय राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला लावतो. या लोकांचं खरं रूप जनतेसमोर येतंय. एखाद्या खासदारांच्याकडे नाव घेऊन थुंकणे कुठल्या संस्कृतीमध्ये बसतं. त्यांच्या पक्षाने नवीन चॅनल सुरू केलं. मात्र राऊत आणि अंधारेंना त्यात घेतलं नाही. बाळासाहेबांबद्दल घाणेरडे शब्द वापरतांना अंधारेंनी विचार केला पाहिजे, असा इशाराही दीपक केसरकरांनी दिला. अजितदादा राजकारणातले अमिताभ - सुप्रिया सुळे तर केसरकर यांच्या या ऑफरवर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. चित्रपटात जसे अमिताभ बच्चन सर्वांना हवे असतात. तसेच अजितदादांच्या बाबतीत आहेत. अजित पवार राजकारणातले अमिताभ बच्चन आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.