मुंबई, 16 जून : कर्नाटकात एकहाती काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील बदलाबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे धडे वगळल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसरं काही अपेक्षित नाही असं म्हटलंय. फडणवीस म्हणाले की, एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही सावरकर, हेडगेवार आणि कोणतेही स्वातंत्र्यसेनानी काढू शकत नाही.काँगेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसर काही अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करण्याकरिता कर्नाटकचं सरकार घेत आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच का ? असा सवाल फडणवीस यांनी महाविकास आघाडीला केला. कर्नाटकात अभ्यासक्रमात बदल केला त्यावर उद्धव ठाकरेजी आता तुमची प्रतिक्रिया काय ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते सावरकरांच नाव पुसायला निघालेत. ते धर्मांतरणाला समर्थन द्यायला निघालेत, आता तुमचं मत काय? सत्तेकरीता तुम्ही हा समझौता केला, हे यातून स्पष्ट होत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले.. पण असे निर्णय घेतल्याने कोणाचही नाव जनतेच्या मानस पटलावरुन पुसू शकत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं. कर्नाटकने सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे वगळले, भाजपने साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कर्नाटकातील अभ्यासक्रम बदलावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी लंडन मधूनच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटक मध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का? उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. उद्धव ठाकरेंनी कर्नाटकाच्या मुद्द्यावर आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एक मत काँग्रेसला आणि एक मत भाजपला काय करू शकतो हे कर्नाटकच्या प्रकरणावरून दिसून येत आहे. काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा अपमान केला होता आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा उडवून टाकला आहे. एवढेच नाही तर धर्मांतरण बंदी कायदा रद्द केला आहे. भविष्यात एक गोहत्या बंदीचा कायदा रद्द करतील. काँग्रेसला दिलेला एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचा कर्नाटक उदाहरण आहे असंही बावनकुळे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.