नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: गुंतवणुकीसाठी शेअर (Shares), सोनं (Gold), स्थावर मालमत्ता, पोस्टाच्या विविध योजना, म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं आहे. इतर पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंड काही बाबतीत अधिक लाभदायक आहे. काय आहेत हे फायदे जाणून घेऊया.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक (Investment)करणं सहज सोपं आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार योजना निवडता येते इतकं व्यापक वैविध्य (Variety) या म्युच्युअल फंड योजनांमध्ये असतं. इक्विटी फंड, डेट फंड आणि हायब्रीड फंडस असे तीन गटात म्युच्युअल फंड्सचं वर्गीकरण करता येतं. याशिवाय सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांकरता गोल्ड फंडासारख्या योजनाही उपलब्ध आहेत. कर बचतीसाठीही काही खास योजना असतात.
म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? गुंतवणुकीआधी नेमकं काय करावं?
वैविध्यामुळे जोखीम कमी
म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांकडून जमा झालेला पैसा शेअर्स, कर्जरोखे अशा विविध लाभदायी पर्यायांमध्ये गुंतवतात. या वैविध्यामुळे (Diversification) जोखीमही कमी होते आणि लाभाचं प्रमाणही वाढतं. गुंतवणूकदाराला या विविध पर्यायांमधील गुंतवणूकीचा आपोआप लाभ मिळतो.
IPO: 1 डिसेंबरपासून 3 दिवस आहे कमाईची संधी, गुंतवणुकीसाठी राहा तयार
स्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला गुंतवणूकीपूर्वी ज्या कंपन्यांचे शेअर घेणार त्या प्रत्येक कंपनीबद्दल संशोधन करणं तसंच गुंतवणूकीवर लक्ष ठेवणंही आवश्यक असतं. तसं इथं करावं लागत नाही.
फंड मॅनेजरमुळे फायदा
इथे गुंतवणूकदारासाठी हे काम तज्ज्ञ व्यक्ती (Expert) करतात. हे म्हणजे आपल्याला ड्रायव्हिंग येत नसेल तर आपण ड्रायव्हर ठेवतो, तसे आहे, किंवा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी सीए नेमतो तसे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर्स किंवा अन्य गुंतवणुकीबद्दल सखोल ज्ञान असते असे नाही. तसेच प्रत्येकाला गुंतवणुकीपूर्वी त्याचा अभ्यास करायला वेळही नसतो. म्युच्युअल फंडसमधील निधीचे व्यवस्थापन, गुंतवणूक तज्ज्ञ व्यक्तीमार्फत म्हणजे फंड मॅनेजर्सतर्फे (Fund Managers) केलं जातं. फंड मॅनेजर्स संशोधन आणि विश्लेषण करून गुंतवणूकींचा वेळेवर आढावा घेतात आणि गुंतवणूकीत बदल करून जास्तीत जास्त फायदा मिळवतात आणि तो गुंतवणूकदारापर्यंत पोहोचवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला स्वतः हे करणं शक्य नसतं. म्युच्युअल फंडामधील कुशल व्यवस्थापनाचा (Excellent Management) लाभ गुंतवणूकदारांना मिळतो.
कर सवलत
म्युच्युअल फंड गुंतवणूकीवर कर बचतीचाही (Tax Benefit) फायदा मिळतो. जो शेअर्स, बँक ठेवी यामध्ये मिळत नाही. दीर्घकालीन गुंतवणूकीवर कर सवलत घेता येते तसंच काही योजना खास कर सवलतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आखलेल्या असतात. अशा ईएलएसएस (ELSS) म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममुळे कर बचत आणि चांगला परतावा असे दोन्ही लाभ मिळतात. या योजनांमध्ये एकावेळी 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.
100 रुपयांची गुंतवणूकही उपयुक्त
म्युच्युअल फंडात गुंतवणुक करताना अल्प रकमेचा तसंच एकरकमी गुंतवणूकीचाही पर्याय उपलब्ध आहे. आपल्या सोयीनुसार त्याची निवड करता येते. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवता येते. याला सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) म्हणतात. त्यामुळे अनेक लोकांना आपल्या बजेटनुसार गुंतवणूक करता येते.अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. काही विशिष्ट योजनांमध्ये तर ही किमान एसआयपी रक्कम 100 रुपये आहे.
6 रुपयांचा शेअर पोहोचला ₹188 वर, एका वर्षात दिला 3000% रिटर्न
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची प्रक्रियाही अधिक सहज आणि सोपी आहे. काही कंपन्या किंवा वैयक्तिक एजंट ही सेवा देतात. यासाठीची प्रक्रियाही अगदी सुटसुटीत आहे. खूप कागदपत्रे, फॉर्म भरणे, वारंवार फेऱ्या मारणे असे प्रकार यासाठी करावे लागत नाहीत. घरी येऊनदेखील ही सेवा दिली जाते. आता ऑनलाइनदेखील गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊनही गुंतवणूकदाराला स्वतः गुंतवणूक करता येते.
म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा खर्चदेखील कमी आहे. एजंटद्वारे गुंतवणूक केली तरी त्यासाठी आकारले जाणारे शुल्क अत्यल्प असते. शेअर्सच्या तुलनेत हा खर्च किरकोळ असू शकतो. वारंवार खर्च करावा लागत नाही.
पारदर्शकता आणि फ्लेक्झिबिलिटी
पारदर्शकता (Transperancy) आणि लवचिकता (Flexibilty)हे देखील म्युच्युअल फंडाचे महत्त्वाचे फायदे आहेत. म्युच्युअल फंडावर सेबीचे (SEBI)नियंत्रण असते त्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शकपणे दाखवावे लागतात. कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदाराला त्याने केलेली गुंतवणूक, त्यातील खर्चाचा अधिभार वगळता कंपनीने गुंतवलेले पैसे, त्यात त्या वेळच्या बाजार भावाप्रमाणे मिळालेले युनिट्स याची माहिती नियमित आणि वारंवार देत असते. सेबीचे नियंत्रण असल्याने गुंतवणूक सुरक्षितही (Secure) असते. ही सुरक्षा शेअर्समध्ये किंवा अन्य जोखीमयुक्त पर्यायात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला मिळत नाही.
Savings Vs Current | सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट तुमच्या फायद्याचं कोणतं?
म्युच्युअल फंडातील रक्कम काढण्याची प्रकियाही सुलभ असते. अटींचं पालन करून तुम्ही अगदी सहजपणे मुदतीआधी पैसे काढू शकता. तुमच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नसते. हे काम ऑनलाइन करता येते. एकरकमी पैसे गुंतवून त्यातून ठराविक रक्कम दरमहा गुंतवण्याची सुविधाही यात मिळते. कर्ज मिळण्याचीही सोय असते. ठराविक मुदतपूर्तीनंतर तुम्ही गुंतवणूक काढून घेऊ शकता किंवा ती रक्कम तशीच ठेवू शकता.
सुरक्षित पर्याय
शेअर बाजारातील फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदाराला देणारे म्युच्युअल फंड हा सुरक्षित आणि अधिक परतावा देणारा अत्यंत सहजसोपा पर्याय आहे. इतर पर्यायांच्या तुलनेत याचे लाभ अधिक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.