मुंबई, 25 नोव्हेंबर: जेव्हा आपण एखाद्या बँकेच्या शाखेत नव्यानं अकाउंट सुरू करण्याच्या उद्देशानं जातो. तेव्हा बँकेतील कर्मचारी आपल्याला प्राथमिक माहितीसह अकाउंट सुरू करण्यामागील उद्देश विचारतात. अर्थात त्यामागे काही कारणं असतात. अकाउंटच्या अनुषंगानं प्रत्येक बँकेच्या काही विशेष सुविधा, प्रकार असतात. सेव्हिंग अकाउंट (Saving Account) जरी सुरू करायचं म्हणलं तरी त्याचे जॉईंट अकाउंट, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेव्हिंग अकाउंट, रेग्युलर किंवा बेसिक सेव्हिंग अकाउंट आदी उपप्रकार असतात. तसेच सेव्हिंग अकाउंटप्रमाणे अजून एक अकाउंटचा प्रकार असतो, तो म्हणजे करंट अकाउंट (Current Account). सेव्हिंग आणि करंट अकाउंटच्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये (Facilities) खूप फरक असतो. या दोन्ही अकाउंटचा उद्देशही निराळा असतो. सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये नेमका फरक कसा, या माध्यमातून ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळतात, ते सविस्तर जाणून घेऊया.
आपण जेव्हा रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये जातो, तेव्हा कार्ड स्वाइप केल्यानंतर स्क्रिनवर आपल्याला सर्वप्रथम सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट असे दोन स्वतंत्र ऑप्शन्स दिसतात. त्यावेळी करंट अकाउंट म्हणजे काय? असा प्रश्न नकळत आपल्या मनात येतो. खरं तर सेव्हिंग आणि करंट अकाउंट हे दोन्ही भिन्न असतात. तसेच त्यांचे उद्देशही वेगळे आहेत. ज्या व्यक्तींचे मासिक किंवा दैनंदिन आर्थिक व्यवहार (Transactions) हे मर्यादित रकमेचे किंवा कमी प्रमाणात आहेत, ज्यांचे फायनान्शियल गोल्स मर्यादित आहेत, तसेच ज्या व्यक्ती बचत करण्याच्या उद्देशानं अकाउंटमध्ये रक्कम ठेवू इच्छितात, अशा व्यक्तींना सेव्हिंग अकाउंट सुरू करण्याचा सल्ला संबंधित बँकेकडून दिला जातो.
अर्थात बचतीला प्रोत्साहन मिळावे हा या मागील उद्देश असतो. परंतु, एखादी कंपनी, फर्म किंवा व्यापार करणाऱ्या व्यक्तीचे दैनंदिन आर्थिक व्यवहार हे मोठया प्रमाणावर असतात. त्यांची आर्थिक उलाढाल रोजची असते, अशा घटकांना करंट अकाउंटचा पर्याय निवडावा लागतो. देशातील बहुतांश बँकांकडून करंट अकाउंटची सुविधा ग्राहकांना दिली जाते.
सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये फरक काय?
याशिवाय सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये काही मुलभूत फरक आहे. तसेच एखादा ग्राहक वैयक्तिक किंवा जॉईंट सेव्हिंग अकाउंट सुरू करू शकतो. सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्हाला धनादेश किंवा चेकची (Cheque) सुविधा मिळते. सेव्हिंग अकाउंटमध्ये असलेल्या रकमेवर संबंधित बँकेकडून अगदी 4 ते 6 टक्क्यांपर्यंत व्याज (Interest) दिलं जातं. मात्र, करंट अकाउंटसाठी ही सुविधा नसते. त्यामुळे करंट अकाउंटला व्याजविरहित ठेव अकाउंट असंही म्हणता येईल. याचाच अर्थ करंट अकाउंटमधील रकमेवर बँका सहसा कोणतेही व्याज देत नाहीत. करंट अकाउंटलाही चेकची सुविधा मिळते. करंट अकाउंटही जॉइंट असू शकतात.
सेव्हिंग अकाउंटच्या माध्यमातून व्यवहारासाठी काही मासिक मर्यादा असतात. सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही महिन्याला विनाशुल्क 3 ते 5 ट्रान्झॅक्शन्स करू शकता. परंतु, करंट अकाउंटच्या माध्यमातून व्यवहारासाठी कोणतीही मर्यादा नसते. जर एखाद्या वेळी सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला `ओव्हरविड्रॉ` असा मेसेज येतो. कारण बँका सेव्हिंग अकाउंटसाठी ओव्हरड्राफ्टची (Overdraft) सुविधा देत नाहीत. परंतु, अशा प्रकारची सुविधा करंट अकाउंटला असते. या अकाउंटमधून व्यवहाराला कोणतीही मर्यादा नसते. या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही अमर्याद ट्रान्झॅक्शन्स करू शकता.
सेव्हिंग अकाउंट असलेल्या खातेधारकाला त्याच्या खात्यात किमान रक्कम शिल्लक (Minimum Balance) ठेवावी लागते. या अकाउंटसाठी आवश्यक असलेली किमान शिल्लक रक्कम ही मुळातच कमी असते. समजा सेव्हिंग अकाउंटमध्ये संबंधित खातेधारकानं किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर त्याचं खातं बंद होऊ शकतं किंवा त्याला दंड भरावा लागू शकतो. मात्र, करंट अकाउंटच्या बाबतीत हा नियम थोडा वेगळा असतो. कारण सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत करंट अकाउंट असलेल्या खातेधारकाला अकाउंटमध्ये तुलनेने जास्त रक्कम शिल्लक ठेवावी लागते.
सामान्यतः ज्यांचे मासिक उत्पन्न हे स्थिर आणि सातत्यपूर्ण आहे, अशा नोकरदार वर्ग, पेन्शनर्स, कामगार वर्गासाठी सेव्हिंग अकाउंट हा उत्तम पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्तींना भविष्यात मुला-मुलींचे विवाह, पर्यटन, औषधोपचार, कार खरेदी आदी गोष्टींसाठी बचत करायची आहे, त्याच्यासाठी देखील सेव्हिंग अकाउंट फायदेशीर ठरतं. सातत्यानं मोठ्या रकमेचे अर्थिक व्यवहार करावे लागतात, अशा कंपन्या, फर्मस, व्यापारी वर्गाला करंट अकाउंटचा पर्याय उपयुक्त ठरतो.
एकूणच बचत हा सेव्हिंग अकाउंटचा मूळ उद्देश आहे. या बचतीवर ग्राहकास व्याज देखील मिळतं. दैनंदिन, मासिक अमर्याद व्यवहार हे करंट अकाउंटचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या अकाउंटमधील रकमेवर ग्राहकांना व्याज मिळत नाही. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार आणि सुलभ आर्थिक व्यवहरांसाठी यापैकी एका अकाउंटची निवड करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Saving bank account, बँक