मुंबई, 18 नोव्हेंबर : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) सध्या उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. त्यामध्ये काही पेनी शेअर्स अर्थात छोट्या-किरकोळ किमतीच्या शेअर्ससह मोठ्या किमतीच्या शेअर्सपर्यंत अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. त्याच टाटा ग्रुप या महत्त्वाच्या समूहातल्या एका कंपनीच्या शेअरनेही गेल्या वर्षभराच्या काळात गुंतवणूकदारांना भरभक्कम परतावा दिल्याचं दिसून आलं आहे.
टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड अर्थात TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची (Tata Teleservices) सबसिडियरी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या सेग्मेंटमध्ये आघाडीवरची कंपनी असून, ती डेटा आणि व्हॉइस सर्व्हिसेस (Data and Voice Services) देते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक बड्या व्यक्ती आणि संस्थांची नावं आहेत.
TTML च्या एका शेअरचा भाव 17 नोव्हेंबर 2020 रोजी अवघा नऊ रुपये एवढा होता. त्या वेळी एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला 1334 शेअर्स मिळाले असते. 17 नोव्हेंबर 2021 रोजी म्हणजेच बरोब्बर एका वर्षाने त्या शेअरचं मूल्य सुमारे 75 रुपये आहे. म्हणजेच त्या वेळी 12 हजार रुपये गुंतवलेल्या व्यक्तीला मिळालेल्या 1334 शेअर्सचं मूल्य आज 1.01 लाख रुपये एवढं झालं आहे.
गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस्ड सर्व्हिस कंपन्यांसाठी सुरू केली आहे. त्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल सेवा मिळत आहेत. शेअरच्या मूल्यात वाढ होण्याचं हे एक कारण असू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
शिवाय कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे आणि तोटा कमी होत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीचा तोटा 1410 रुपयांवरून घटून 632 कोटींवर आला आहे. प्रमोटर्सची भागीदारी सर्वांत जास्त असणं ही कंपनीसाठी चांगली बाब आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टाटा सन्सची (Tata Sons) या कंपनीत 74.26 टक्के भागीदारी आहे. तसंच, 25.64 टक्के भागीदारी रिटेल गुंतवणूकदारांची आहे. टाटा सन्स कंपनी TTML या कंपनीला टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस (TTBS) या नावाने लाँच करू शकते. त्यामुळे एकंदरीतच कंपनीची वाटचाल चांगली चालली आहे.
TTML या कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी आली असून, शेअरमध्ये पाच टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या शेअरने एका वर्षात 1000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. आगामी दिवसांतही ही तेजी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विद्यमान पातळावरून नफा मिळवला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
टीटीएमएलच्या शेअरच्या मूल्यात गेल्या एका आठवड्यात 10 टक्क्यांनी, गेल्या एका महिन्यात 44 टक्क्यांनी, गेल्या तिमाहीत 110 टक्क्यांनी, गेल्या सहामाहीत 800 टक्क्यांनी, तर गेल्या एका वर्षात तब्ब्ल 1046 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.