मुंबई : महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. आपल्या देशामध्ये अशा खूप महिला उद्योजिका आहेत, ज्या उद्योग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण अनेक महिलांना हे यश मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा खूपच खडतर आहे.
उत्तर प्रदेशातील ‘गोरखपूर रत्न’ हा पुरस्कार नुकताच मिळालेल्या संगीता पांडेय यादेखील त्याला अपवाद नाहीत. तीन वर्षांपूर्वी अवघ्या 1500 रुपयांच्या भांडवलावर संगीता यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, व आज त्यांच्याकडे करोडोची मालमत्ता आहे. संगीता पांडेय यांची ही संघर्षमय कहाणी इतरांसाठीही प्रेरणादायी असून आज आपण ती जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील संगीता पांडेय या महिलेची सध्या खूप चर्चा सुरू आहे. कारण संगीता यांनी अवघ्या 3 वर्षांपूर्वी 1500 रुपये आणि सायकल एवढ्याच भांडवलावर सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाची उलाढाल आज तीन कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संगीता पांडेय यांना ‘गोरखपूर रत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. चला तर, मध्यमवर्गीय कुटुंबातील संगीता या इतर महिलांसाठी प्रेरणास्रोत कशा बनल्या, ते जाणून घेऊ.
नवा व्यवसाय सुरु करायचाय? 'हे' लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी
संगीता पांडेय या गोरखपूरमधील झर्नटोला येथील रहिवासी आहेत. त्यांनी सर्वसामान्य महिलांपेक्षा थोडा वेगळा विचार करून उद्योजक बनण्याचा निर्धार केला, आणि संघर्षाच्या वाटेवर वाटचाल करीत मोठं स्थान प्राप्त केलं आहे. त्यामुळेच आज संगीता पांडेय यांच्या कर्तव्याला अनेकजण सलाम करत आहेत.
लष्करी कुटुंबात झाला जन्म
गोरखपूर रत्न पुरस्कार मिळालेल्या संगीता सांगतात की, ‘माझा जन्म लष्करी कुटुंबात झाला आहे. माझे वडील आणि दोन्ही भाऊ लष्करात आहेत. मी सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाकांक्षी होते. प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयातून घेतल्यानंतर मी गोरखपूर विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर मला वाटत होतं की, आता माझी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जी इच्छा आहे, ती कुठेतरी दाबली जात आहे.’
पण जेव्हा संगीता यांनी काहीतरी वेगळं करायचे ठरवलं, तेव्हा त्यांच्या मनात पहिला प्रश्न होता की, काय करावं? त्या सांगतात, ‘एके दिवशी मी मिठाईच्या दुकानात वापरले जाणारे बॉक्स पाहिले, आणि तिथून डोक्यात विचार आला की, आपण हे बॉक्स बनवण्याचा व्यवसाय का सुरू करू नये?’ अखेर त्यांना हा व्यवसाय सुरु करण्यात यश आलं. आज त्या गोरखपूर येथतील पदरी बाजार येथील शिवपूर साहबाजगंजमधील मिठाईच्या दुकानात वापरल्या जाणार्या फॅन्सी आणि पॅकेजिंग बॉक्स बनवण्याच्या कारखाना व महिला बचत गटसुद्धा चालवतात.
अशी मिळाली पहिली ऑर्डर
दुष्काळग्रस्त बीडमध्ये फुलवले झेंडू, आज करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO
व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला संगीता पांडेय यांना अनेक अडथळे आले. त्याबाबत सांगताना त्या म्हणतात, ‘मला सुरुवातीला अनेक अडथळे आले. पण माझ्या मनात एक विश्वास कायम होता. जेव्हा मी पहिल्यांदाच गोलघरच्या सर्वांत नावाजलेल्या मिठाईच्या दुकानात पोहोचले, तेव्हा सर्वांत प्रथम माझ्याकडे आश्चर्यानं पाहिलं गेलं. तुम्हाला हे कसं शक्य होईल, तुम्ही एक स्त्री आहात. या व्यवसायासाठी खूप मेहनत आवश्यक आहे.
तुमच्याकडे तर फक्त एक सायकल आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यावेळी मलाही वाटलं की, हे जे बोलत आहेत, त्यामध्ये तथ्य आहे. तेव्हा माझं मन विचलित झाले होतं. पण एकेदिवशी दुकानाचा मालक म्हणाला की, आम्ही मिठाई पॅकिंग करण्यासाठी लागणारा माल हा लखनऊ येथून मागवतो. पण तुम्ही खूप मेहनत करत आहात, म्हणून मी ऑर्डर देतो. मला मिळालेलं हे काम मी आव्हान म्हणून स्वीकारलं, आणि नेमकं त्यांना तसेच 20 पॅकिंगचे बॉक्स तयार करून दिले, जे ते लखनऊवरून मागवत होते. त्यांना ते खूप आवडले, आणि तेव्हापासून आजतागायत ते आमचे हक्काचे ग्राहक झाले आहेत.’
यशस्वी प्रवासाला झाली सुरुवात
पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र संगीता यांनी मागे वळून पाहिलं नाही. तिथूनच त्यांच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचा व्यवसाय वेगानं वाढू लागला. व्यवसायासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं. आज गोरखपूरपासून महाराजगंज, देवरिया, कुशीनगर, बस्ती, सिवान, गोपालगंज आणि आसपासच्या जिल्ह्यांत त्यांचा व्यवसाय पसरला आहे. आता मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये भेटवस्तूंसाठी पॅकिंग बॉक्ससुद्धा त्या देतात.
दिवाळी आणि इतर मोठ्या सणांना तर एवढी ऑर्डर असते, की अजिबात वेळ मिळत नाही. संगीता यांनी त्यांच्यासोबत सुमारे 150 महिलांना रोजगारही दिलाय. त्या सांगतात की, ‘मी इतर कुटुंबातील महिलांप्रमाणेच माझ्या आयुष्याची सुरुवात केली. पण आज माझं इतकं मोठं कुटुंब आहे की, माझ्या कारखान्यात महिला आणि पुरुष असे मिळून जवळपास 150 कर्मचारी एकत्र काम करत आहेत. या कुटुंबाला सोबत घेऊन मी पुढे जात आहे.’
आज आहे करोडोंची मालकीण
संगीता यांनी सांगितलं की, ‘मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं होतं, आणि त्यासाठी मी माझ्याकडे असणारे 1500 रुपये आणि सायकल याआधारे व्यवसाय सुरू केला. मला सुरुवातीला माझे पती आणि सासरच्या मंडळींचा पाठिंबा मिळाला नाही. अनेकांचे टोमणे ऐकायला मिळाले. पण माझ्या मनात काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय होता. त्यामुळेच मी संघर्ष करत माझा प्रवास सुरु ठेवला. आज मी करोडो रुपयांच्या व्यवसायाची मालकीण आहे.’
नोकरी सोडून शेती करतोय 'हा' तरुण, वर्ध्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 4 लाखांचे उत्पन्न!
गोरखपूर रत्न देऊन सन्मान
संगीता पांडेय यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय संघर्षमय परिस्थितीत केली आहे. परंतु त्यांच्या मेहनतीमुळे आणि व्यवसायाप्रती असणाऱ्या समर्पणामुळे आज गोरखपूरच्या लघुउद्योगक्षेत्रात त्यांना मोठे मानाचे स्थान मिळाले आहे. संगीता आज सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा ‘गोरखपूर रत्न’ देऊन गौरव करण्यात आलाय. हा पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, ‘हा सन्मान मला अधिक प्रेरणा देतो. कारण मुख्यमंत्री संपूर्ण राज्यासाठी खूप काही करत आहेत, आणि त्यांच्याकडून हा सन्मान मिळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.’
दरम्यान, गोरखपूर रत्न मिळाल्यानंतर संगीता पांडेय यांच्या खडतर प्रवासाची खूप चर्चा सुरू आहे. त्यांचा हा प्रवास इतर महिलांसाठी खूपच प्रेरणा देणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Marathi news, Money