नवी दिल्ली, 14 जून: आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा अर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) हे दोन्ही दस्तावेज एकमेकांशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वारंवार मुदतवाढ देखील दिली होती. मात्र आता यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे दस्तावेज तातडीने लिंक करावेत असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.
देशातील कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक (Pan-Aadhar Link) करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ही मुदत आता 31 मार्च ऐवजी 30 जून असेल. तथापि, आता वाढवून दिलेली अंतिम मुदत संपण्यासाठी फारच कमी वेळ बाकी राहिला आहे. सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्डाने (CBDT) आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, जर पॅनकार्ड आधारशी मुदतीत लिंक केले नाही तर ते रद्द होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर एखाद्या युजरने आपले पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले तर पॅन कार्ड आधार क्रमांकाच्या सूचनेच्या तारखेपासून कार्यान्वित होईल.
हेही वाचा- Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2021 च्या अर्थसंकल्पात, प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये केंद्र सरकारने नवीन कलम 234 एच जोडला. ज्यानुसार, जर युजरने पॅन कार्ड मुदतीनंतर आधार कार्डशी जोडले तर त्या युजरकडून याकरिता शुल्क घेतले जाणार आहे. नवीन कलमानुसार, जर 1 जुलै 2021 रोजी किंवा त्यानंतर पॅनकार्ड आधारशी जोडले तर त्या व्यक्तीला दंड भरावा लागणार आहे. मात्र दंडाची ही रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल.
जर तुमचे पॅनकार्ड निष्क्रीय किंवा बंद झाले तर तुम्ही पॅनची गरज असलेले कोणतेही अर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. सीबीडीटीच्या फेब्रुवारी 2020 मधील अधिसूचनेनुसार, एकदा पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले गेले की ज्या तारखेला पॅन आधार कार्डाशी जोडले गेले आहे त्याच तारखेपासून ते कार्यान्वित होईल. परंतु, जर पॅन आधार कार्डशी अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 30 जूननंतर जोडले गेले तर संबंधित व्यक्तीला कलम 234 एच अंतर्गत यासाठी शुल्क अदा करावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक करुन घ्यावे, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा- पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की...
आयकर कायद्यानुसार (Income Tax Law), एखाद्या व्यक्तीने 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केले नाही आणि पॅनकार्ड निष्क्रीय किंवा बंद झाले तर अशा व्यक्तीस पॅन संबंधी माहिती सादर करणे आवश्यक असेल. अन्यथा त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही, माहिती दिली नाही असे समजले जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तींना आयकर कायद्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Aadhar card link, Pan card