Nirmala Sitharaman Interview after Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटनंतर पहिल्यांदाच मुलाखत दिली आहे. नेटवर्क 18 ला शुक्रवारी त्यांनी ही पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी मनरेगाविषयी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, 'जल जीवन मिशनप्रमाणेच मनरेगामध्ये रोजगाराच्या शोधात असलेल्या ग्रामीण मजुरांनाही पंतप्रधान आवास योजनेचा (PMAY) लाभ मिळेल. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी 66 टक्के वाढीची तरतूद करण्यात आली आहे.'
मनरेगाच्या कमी बजेटविषयी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, 'मनरेगा हा मागणीवर आधारित कार्यक्रम आहे. राज्यांच्या मागणीवर आधारित यंदाचे वाटप कमी करण्यात आले आहे. पण मागणी वाढल्यास, अनुदानाच्या पुरवणी मागणीत मनरेगाच्या बजेटमध्ये वाढ होऊ शकते. बीई आणि आरईच्या गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर ते स्पष्ट होते.'
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या (मनरेगा) वाटपात जवळपास एक तृतीयांश कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सादर केलेल्या बजेटमध्ये म्हटले आहे की, 2023-24 साठी मनरेगाला 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मागील आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजापेक्षा सुमारे 32 टक्के कमी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने अर्थसंकल्पात मनरेगासाठी 73,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर सुधारित अंदाजानुसार, खर्च 89,400 कोटी रुपये होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) परिव्यय 66 टक्के वाढवून 79,000 कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत ग्रामीण आणि शहरी गरिबांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा योग्य अर्थसंकल्प आहे. हेच लक्षात घेऊन बजेटच्या खर्चात मोठी वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.