नवी दिल्ली, 14फेब्रुवारी : आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी कुठे ना कुठे तरी गुंतवणूक करत असते. सुरक्षित आणि चांगल्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यापैकी महत्त्वाचे पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस (Post Office) आणि एलआयसीमधली (LIC) गुंतवणूक. पोस्ट खात्याच्या नऊ बचत योजना (Savings Scheme) असून, त्यांचा वार्षिक व्याजदर सुमारे 7.6 टक्क्यांपर्यंत आहे. एलआयसीच्याही काही गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. त्यांबद्दल जाणून घेऊ या.
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडता येतं. तसंच, टाइम डिपॉझिट (मुदत ठेव) आदींसह पीपीएफ, एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट), किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येते.
मासिक आय योजना (MIS)
मासिक आय योजना ही केंद्रीय संचार मंत्रालयाकडून चालवली जाणारी एक गुंतवणूक योजना आहे. नेहमीच्या खर्चांसाठी तुम्हाला दर महिन्याला काही ठरावीक रक्कम मिळायला हवी असेल, तर पोस्टाची मासिक आय योजना हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेसाठी किमान एक हजार रुपयांत खातं सुरू केलं जाऊ शकतं. त्यात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. तसंच, डेट इन्स्ट्रुमेंट्सच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) :
या योजनेचा गुंतवणूक कालावधी पाच वर्षं आहे. या योजनेत सध्या वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनेत केवळ एकदाच गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक किमान एक हजार रुपयांपासून जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या योजनेअंतर्गत साठ वर्षांवरील व्यक्तीचंच खातं उघडता येतं.
पाच वर्षांची आवर्ती ठेव (Recurring Deposit)
पोस्ट ऑफिसमध्ये कमीत कमी 100 रुपये प्रति महिना अशा हप्त्याने आरडी (आवर्ती ठेव) उघडता येते. या ठेवीचा कालावधी पाच वर्षं असतो. आरडीवर सध्या वार्षिक 5.8 टक्के दराने व्याज मिळतं. या योजनेत सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडता येतं. तसंच 10 वर्षांहून अधिक वयाच्या मुलाचं, तसंच बौद्धिक विकलांग व्यक्तीचंही अकाउंट उघडता येतं. महिन्याच्या 15 तारखेच्या आधी अकाउंट उघडलं असेल, तर दर महिन्याच्या 15 तारखेच्या आधी तुमचा मासिक हप्ता त्यात डिपॉझिट होणं गरजेचं आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD)
पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षापासून पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी टाइम टिपॉझिट खातं उघडता येतं. हे खातं किमान 1000 रुपये भरून उघडावं लागतं. जास्तीत जास्त किती पैसे भरावेत, याला मर्यादा नाही. यावर सध्या वार्षिक 5.5 ते 6.7 टक्के दराने व्याज मिळतं.
भारतीय जीवन विमा निगम (LIC) अर्थात एलआयसीच्या पॉलिसीज बऱ्याच लोकप्रिय असतात. एलआयसीकडून गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध केले जातात.
न्यू बिमा बचत प्लॅन : ही एक मनी बॅक योजना आहे. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सिंगल प्रीमियम लॉयल्टीसह (लागू असल्यास) परत केला जातो. ही योजना गुंतवणूकदाराला असलेल्या आर्थिक गरजांचाही विचार करते. त्यामुळे या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. यात नऊ, 12 आणि 15 वर्षांच्या पॉलिसीचे पर्याय आहेत. पॉलिसीच्या पहिल्या पाच वर्षांच्या आत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास विमा उतरवलेली रक्कम परत मिळते. पाच वर्षांनंतर मृत्यू झाल्यास विमा रकमेसोबतच लॉयल्टीही मिळते. कमीत कमी 15 वर्षं आणि जास्तीत जास्त 50 वर्षांच्या व्यक्तीच्या नावे ही पॉलिसी घेता येते.
न्यू जीवन शांती डेफर्ड अॅन्युइटी प्लॅन
एलआयसीने निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याच्या उद्देशाने ही योजना सादर केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, व्यक्तिगत, सिंगल प्रीमियमची डेफर्ड अॅन्युइटी योजना आहे. नव्या जीवन शांती योजनेच्या वार्षिक व्याजदराची खात्री पॉलिसी सुरू होतानाच दिली जाते, असं एलआयसीकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. जइंट लाइफ प्लॅनसाठी किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार वार्षिक, षण्मासिक किंवा तिमाही स्वरूपात करू शकता. या प्लॅनमध्ये कमीत कमी अॅन्युइटी म्हणजे वार्षिक वेतन 12 हजार रुपये आहे.
हे देखील वाचा - मुलांच्या उत्तम आयुष्याच्या चांगल्या सुरुवातीसाठी आवश्यक आणि महत्त्वाचा मार्ग – सकस आहार
एलआयसीचा न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन (Money Back Plan)
भारतीय जीवन विमा निगमची अशीच एक योजना आहे, जी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात अगदी नवजात बाळाचाही विमा उतरवता येतो. 12 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करता येते. यात कमीत कमी 10 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रीमियमन वेव्हर बेनिफिट रायडर ऑप्शनही उपलब्ध आहे. या योजनेची एकूण मुदत 25 वर्षांची असते. त्याअंतर्गत मुलं 18, 20 आणि 22 वर्षांची झाल्यावर विमा रकमेच्या 20 टक्के रक्कम एलआयसीकडून दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Investment, LIC, Post office