नवी दिल्ली, 1 जून : आजकाल कर्ज (loan) सहज मिळतं. म्हणजे घर (home) घ्यायचं असेल किंवा कार (car) घ्यायची असेल, तर कर्ज मिळतंच, पण याशिवाय अगदी फोन (phone), टीव्ही (TV) फ्रीजसारख्या वस्तू घेण्यासाठीही कर्ज मिळतं. कर्ज घेणं आणि ते फेडणं सोपं झाल्यामुळे कर्ज घेतलं जातं. कर्ज केवळ बँकेकडूनच घेतलं जातं असं नाही, तर क्रेडिट कार्डवरून (credit card) खरेदी (shopping) करणं किंवा ईएमआयवर (EMI) अर्थात सुलभ मासिक हप्त्यांवर वस्तू घेणं, हेसुद्धा कर्जच आहे.
तुम्ही तुमच्या सभोवताली अशी माणसं पाहिली असतील, ज्यांचा सगळा वेळ पैसा कमावण्यात जातो, मात्र तरीही त्यांची बचत काही होत नाही. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अशा लोकांना त्यांचं आर्थिक व्यवस्थापन नीट करता येत नाही. उदा, ते क्रेडिट कार्डचं बिल उशिरा भरतात. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. अशीच आणखीही अनेक कारणं आहेत.
30 दिवस उशीर केल्यास क्रेडिट स्कोअरचे 100 पॉईंट कमी होऊ शकतात -
काही जण क्रेडिट कार्डचं बिल भरण्यात किंवा ईएमआय भरण्यास उशीर करतात. तुम्ही ही बिलं 1-2 दिवस उशिरा भरत असाल, तर फार काही फरक पडत नाही. मात्र तसं करू नये. कारण एखादा दिवसही उशीर झाल्यास तुम्हाला लेट फी आणि त्या त्या कार्डच्या, कंपनीच्या पॉलिसीनुसार दंड भरावा लागतो. बिल भरायला 30 दिवसांपर्यंत उशीर झाल्यास बँका आणि इतर वित्तीय संस्था त्याला डिफॉल्ट अर्थात कर्जबुडवेगिरी मानत नाही, पण जर 30 दिवस म्हणजेच एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त उशिरा बिल भरलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर 100 पॉइंटने कमी होऊ शकतो. तसंच तब्बल सात वर्षं याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर राहू शकतो. मात्र, तुम्ही व्यवहार वेळेवर पूर्ण करत राहिलात तर हा स्कोअर सुधारू शकतो.
कर्ज फेडण्यासाठी रिटायरमेंट फंड वापरू नका -
अनेक जण कर्ज फेडण्यासाठी रिटाययमेंट फंड अर्थात निवृत्तीसाठी साठवलेला निधी वापरतात. मात्र, हे चुकीचं आहे. अगदी दिवाळं निघालं, तरी रिटायरमेंट फंड कधीच कर्ज फेडण्यासाठी वापरू नये. तो बँकेतून काढला नाही, तर दिवाळं निघालेल्या वेळीही तो सुरक्षित राहतो. म्हणून शक्य असेल तोपर्यंत हा फंड बँकेतून काढू नये.
मुख्य कर्जदार असाल तर तुम्हालाच फेडावं लागेल कर्ज -
अनेक जण आपले मित्र अथवा कोणत्या तरी नातेवाईकासह कर्ज घेतात. मात्र तुम्ही कर्ज घेताना कोणासोबत मिळून घेताय ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे. समोरची व्यक्ती व्यवहाराने वागणारी नसेल तर एकत्र कर्ज घेणं टाळा. तुम्ही मुख्य कर्जदार अर्थात प्रायमरी बॉरोअर असाल, तर तुमच्या साथीदाराने कर्ज फेडलं किंवा नाही, तरी कर्ज फेडणं ही कायदेशीरदृष्ट्या तुमचीच जबाबदारी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.