नवी दिल्ली, 31 मे: देशात 1 जून 2021 पासून अनेक बाबींमध्ये नवे बदल लागू होणार आहेत. त्यात गॅस सिलेंडरच्या दरांपासून प्राप्तिकर वेबसाइटपर्यंत अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. याचा थेट परिणाम बँक, पीएफ खात्यासह प्राप्तिकरावरही होईल. त्यामुळे 1 तारखेच्या आत या सर्व बदलांविषयी माहिती घेणं महत्त्वाचं आहे. 1 जून 2021 पासून या 6 नियमांमध्ये बदल होणार आहे.
- बँक ऑफ बडोदा पेमेंटची पद्धत बदलणार
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda-BOB) 1 जून 2021 पासून आपल्या ग्राहकांसाठी चेकने (Cheque) करण्यात येणाऱ्या पेमेंटची (Payment) पद्धत बदलण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी बँकेने ग्राहकांसाठी पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन (Positive Pay Confirmation) अनिवार्य केलं आहे. 2 लाख किंवा त्याहून अधिक रुपयांचे चेक देताना ग्राहकांना 'पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन'अंतर्गत चेकचे डीटेल्स पुन्हा कन्फर्म करणं गरजेचं आहे.
- गॅस सिलेंडरचे दर
1 जूनपासून एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder) दर बदलतील. दरमहा तेल कंपन्या (Oil Companies) एलपीजी सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करतात. बर्याचदा महिन्यातून दोन वेळादेखील या दरांत बदल केले जातात. सध्या दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 809 रुपये आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरसह 19 किलोच्या सिलेंडरची किंमतही बदलण्याची शक्यता आहे.
- नवी प्राप्तिकर वेबसाइट
1 ते 6 जूनदरम्यान प्राप्तिकर विभागाचं (Income Tax) ई-फाइलिंग पोर्टल (E filing Portal) बंद असेल. 7 जून रोजी प्राप्तिकर विभाग करदात्यांसाठी नवीन ई-फाइलिंग पोर्टल सुरू करणार आहे. आयकर संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विवरणपत्र (ITR) भरण्याची अधिकृत वेबसाइट 7 जून 2021 पासून बदलली जाईल. 7 जूनपासून http://incometax.gov.in हे नवीन पोर्टल अस्तित्वात येईल. सध्या ते http://incometaxindiaefiling.gov.in असं आहे.
- पीएफ अकाउंटला आधार जोडणं अनिवार्य
ईपीएफओने (EPFO) दिलेल्या आदेशानुसार, 1 जूनपासून एखादं खातं आधारशी (Aadhar) जोडलेलं नसेल किंवा आधार व्हेरीफाइड नसेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक चलन किंवा परतावा भरता येणार नाही. अशा परिस्थितीत पीएफ खातेधारकांना कंपनीकडून मिळणारा हिस्सादेखील थांबवला जातो. त्यामुळे पीएफ खातं वेळेत आधारशी जोडणं आवश्यक आहे.
- अल्पबचत योजनांच्या दरात बदल
पीपीएफ (PPF), एनएससी (NSC), केव्हीपी (KVP) आणि सुकन्या समृद्धी या अल्पबचत योजनांच्या (Small Savings Scheme) व्याजदरामध्ये या महिन्यात बदल होतील. सरकारकडून दर तीन महिन्यांनी या बचत योजनांचे नवीन व्याजदर लागू केले जातात.
- गुगल स्टोरेजसाठी पैसे द्यावे लागतील
1 जूनपासून गुगल फोटोजवर (Google Photos) तुम्हाला अमर्यादित फोटो अपलोड करता येणार नाहीत. प्रत्येक जीमेल युजरला आता सर्व सेवांसाठी मिळून 15 जीबी स्पेस देण्यात येईल. यामध्ये ईमेल, फोटोसह गुगल ड्राइव्हदेखील समाविष्ट आहे. 15 जीबीपेक्षा जास्त स्पेस हवी असेल तर युजरला त्यासाठी पैसे द्यावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.