नवी दिल्ली, 28 जानेवारी : देशाचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget) संसदेत (Parliament) सादर करण्याची प्रक्रिया प्रदीर्घ चालणारी तर आहेच पण त्यासोबत अनेक परंपरा जोडलेल्या आहेत. अनेक परंपरा आजतागायत पाळल्या जात आहेत. यातीलच एक महत्त्वाची परंपरा आहे ती म्हणजे अर्थसंकल्पाच्या छपाईपूर्वी अर्थमंत्र्याच्या हस्ते हलवा बनवण्याची (Sweet making). दरवर्षी अर्थमंत्री स्वत: अर्थ मंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये कढईत हा हलवा तयार करतात आणि तो सहकाऱ्यांना वाटतात. याला ‘हलवा सेरेमनी’ असं नाव आहे. ही बरीच जुनी परंपरा अजूनही पाळली जाते. मात्र, यंदा प्रथमच या परंपरेला स्थगिती देण्यात आली आहे. ही परंपरा पाळली न जाण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. याला कारण आहे ते म्हणजे जगभरात आणि देशात पसरलेल्या कोरोना साथीचे (Coronavirus Pandemic). सध्या देशात तसेच दिल्लीत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारचा संसर्ग वेगानं वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच यंदा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात येणार असल्यानं अर्थसंकल्पापूर्वीच्या या हलवा सोहळ्याची परंपरा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वेळेप्रमाणेच याही वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) एक फेब्रुवारीला पेपरलेस ग्रीन बजेट (Paperless Green Budget) सादर करणार आहेत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्यात गोड पदार्थ खाण्याची परंपरा आहे. यानुसारच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प छापण्याच्या पूर्वी हलवा तयार करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार विद्यमान अर्थमंत्री स्वत: हलवा तयार करतात आणि अर्थसंकल्प तयार करण्यासाठी काम करणारे अर्थ मंत्रालयातील कर्मचारी आणि वित्त विभागातील अधिकाऱ्यांना त्याचं वाटप करतात. त्यानंतरच अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्थसंकल्पानंतर Mobile, Gadgets स्वस्त होणार? जाणून घ्या सरकार काय पाऊल उचलणार? काय असतो हलवा सेरेमनी? अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्यापूर्वी, अर्थ मंत्रालय दरवर्षी नॉर्थ ब्लॉकमध्ये (North Block) असलेल्या तळघरात हा ‘हलवा सेरेमनी’ आयोजित करते. अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना साधारण दोन दिवस आधीपासून त्या ठिकाणीच राहावं लागतं. जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थ संकल्प मांडत नाहीत तोपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी नसते. त्याला ‘लॉक इन’ पिरिएड म्हणतात. अर्थसंकल्पाबाबतची गुप्तता पाळण्यासाठी असं केलं जातं. यंदाही अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आलं आहे. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 22 ला सादर होणार आहे त्यामुळे आज 28 जानेवारी 22 पासून हा लॉक इन पिरिएड सुरू झाला. ही सुरुवात हलवा सेरेमनीने होते ती प्रथा मात्र यंदा मोडली गेली. पण या सर्व कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. अर्थसंकल्प सार्वजनिक केल्यानंतरच या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना किंवा अन्य नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाते. नॉर्थ ब्लॉकमध्ये असेलल्या प्रेसमध्येच अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. अर्थसंकल्पाची छपाई सुरू करण्यापूर्वी अर्थमंत्र्याच्या हस्ते हलवा बनवण्याची प्रथा पडली आहे. PVC Aadhaar मागवणं आता आणखी सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं Card राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ओमिक्रॉन या नवीन प्रकारची प्रकरणे वाढत असून, ओमिक्रॉन हा मुख्य स्ट्रेन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, संसर्गाचा धोका आणि आरोग्य विषयक सुरक्षेचे नियम लक्षात घेऊन यावेळी अर्थसंकल्पापूर्वीच्या हलवा सोहळ्याच्या परंपरेला स्थगिती देण्यात आली. दिल्लीतील धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचललं असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.