मुंबई, 23 डिसेंबर : आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोच्या (Wipro) शेअर धारकांना कमाईची मोठी संधी आहे. कंपनीनं शेअरची ‘बायबॅक ऑफर’ जाहीर केली आहे. ही ऑफर 29 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 या दरम्यान असेल. या ऑफरनुसार कंपनी 400 रुपये प्रती शेअरच्या दराने 23.75 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करणार आहे. या शेअर्सची बाजारातील किंमत 9 हजार 500 कोटी रुपये आहे.
26 तारखेला पाठवणार प्रस्ताव
विप्रो कंपनीनं याबाबतची माहिती नियामक मंडळाकडे दिली आहे. त्यानुसार स्टॉक एक्सचेंजमधील लिलावाची शेवटची सेटलमेंट ही 20 जानेवारी किंवा त्यापूर्वी होणार आहे. विप्रो कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 26 डिसेंबर किंवा त्यापूर्वी एका पत्राच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव पाठवणार आहे.
‘Wipro कंपनीची बायबॅक ऑफर अन्य ऑफर्सच्या तुलनेत चांगली आहे,’ असं मत या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ‘या कंपनीच्या रिटेल शेअर होल्डर्सनी शेअर विकून कमी कालावधीमध्ये नफा मिळवावा’, असा सल्ला त्यांनी दिला आहे. विप्रोच्या बायबॅक ऑफरमधील किंमत ही बाजाराभावापेक्षा जास्त असून त्यामुळे गुंतवणुकदारांचं याकडे लक्ष वेधले जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
(हे वाचा-Gold Rates Today: सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, वाचा काय आहे नवे भाव)
मागच्या वर्षीही होती ऑफर
विप्रो कंपनीने 2019 साली देखील ‘बायबॅक शेअर्स’ची ऑफर दिली होती. कंपनीनं मागच्या वर्षी 325 रुपये प्रती इक्विटी शेअरच्या दरानं 32.31 कोटी शेअर्स बायबॅक केले होते. या शेअर्सची एकूण अंदाजे किंमत 10 हजार 500 कोटी रुपये इतकी होती
दोन आयटी कंपन्यांमध्ये लढाई
विप्रोची आयटी क्षेत्रातील प्रतिस्पर्धी असलेल्या टाटा कन्सल्टंनी सर्व्हिसेसनं (TCS) देखील यापूर्वीच बायबॅक शेअर्सची घोषणा केली आहे. TCS 3 हजार रुपये प्रती इक्विटीच्या दराने शेअर्स बायबॅक करत आहे. या कंपनीची किंमत साधारण 16 हजार कोटी इतकी आहे. या कंपनीच्या ऑफरमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर आहे. गुंतवणुकदारांसाठी ही ऑफर 1 जानेवारी 2021 पर्यंत असेल.
(हे वाचा-आरोग्य आणि जीवन विमा घ्यायचा आहे? पॉलिसी घेण्यापूर्वी या घटकांची पडताळणी आवश्यक)
TCS च्या शेअर्सचे दर मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत सध्या 60 टक्के जास्त आहेत. तर विप्रो कंपनीच्या शेअर्सना सध्या दुप्पट भाव मिळत आहे. या दोन्ही कंपन्यांची सध्याची कामगिरी पाहता या कंपन्यांच्या ‘बायबॅक ऑफर’मध्ये सहभागी झाल्यास अतिरिक्त लाभ मिळणार नाही, असंही काही गुंतवणुकदारांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Share market