सॅन अँटोनियो, 30 जानेवारी: दहा वर्षांच्या जेडीन (Jaydyn Carr) कार एका दिवसात लक्षाधीश झाला. त्याच्या आईने त्याच्या नावावर गेल्या वर्षी घेतलेल्या शेअर्समुळे त्याला हे घबाड मिळालं. जेडीनच्या नावावर असलेले Game stop कंपनीचे शेअर्स बुधवारी विकले तेव्हा त्याला 3हजार 200 डॉलर्सचा (साधारण 2 लाख 33 हजारांपेक्षा जास्त) नफा झाला. हे शेअर्स त्याच्या आईनं त्याला वर्षभरापूर्वी भेट दिले होते. एका झटक्यात लक्षाधीश झालेल्या या मुलाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सॅन अँटोनियो (San Antonio) इथं राहणाऱ्या जेडीन कार या दहा वर्षाच्या मुलाची आई, नीना यांनी डिसेंबर 2019 मध्ये गेमस्टॉप (Game stop) या व्हिडिओ गेम कंपनीचे 10 शेअर्स फक्त 60 डॉलर्समध्ये खरेदी केले आणि जेडीनला भेट दिले.
सॅन अँटोनियो एक्सप्रेस-न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रेडइट चॅट ग्रुपने (Reddit Chat group) चालविलेल्या शेअर्सबाबतच्या अंदाजापेक्षा या आठवड्यात गेमस्टॉप कंपनीच्या शेअरच्या किंमती गगनाला भिडल्या. त्यावेळी जेडीननं हे शेअर्स 3200 डॉलर्सपेक्षा थोड्याशा कमी किंमतीला विकून टाकले.
या घटनेबाबत सांगताना नीना म्हणाल्या, "बुधवारी माझा फोन नेमका बंद होता पण माझ्या वॉच लिस्टवर गेमस्टॉप असल्यानं मी त्या शेअरच्या किंमतीतील उलाढाल पाहात होते. मी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की अशा वायुवेगानं शेअर्सचे भाव वाढणं असामान्य आहे. मी त्याला विचारलं की, तुला हे शेअर्स ठेवायचे आहेत की त्याची विक्री करायची आहे?’ त्यानं विकून टाक म्हणून सांगितलं. मी ते शेअर्स विकून टाकले आणि त्यातून आम्हाला साधारण 3200 डॉलर्स मिळाले."
या आई-मुलाच्या जोडीने सांगितले की, यापैकी 2200 डॉलर्सचा निधी जेडीनच्या बचत खात्यात ठेवण्यात येणार असून उर्वरित एक हजार डॉलर्समधून शेअर्समध्ये आणखी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा - लोगोमुळे महिलांचा अवमान होतो, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर Myntra ने घेतला लोगो बदलण्याचा घेतला निर्णय
वॉल स्ट्रीट हादरविणाऱ्या गेमस्टॉपच्या शेअर्समधील या विक्रमी दरवाढीनं गुंतवणूकदारही चक्रावले आहेत. तीन शुक्रवारांआधी 18 डॉलर्स भाव असलेल्या गेमिंग कंपनी गेमस्टॉपच्या शेअरची किंमत चार दिवसांत दुप्पट झाली. त्याच्या किंमतीतील वाढ चालूच राहिली आणि बुधवारी दुप्पटीपेक्षा अधिक वाढ होत, या शेअरची किंमत 347.51 डॉलर्सवर पोहोचली. गुरुवारी, मात्र त्यात घसरण झाली आणि हा शेअर 229 डॉलर्सपर्यंत खाली आला. मात्र 2021च्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये त्यानं मोठी उसळी घेतली आणि तब्बल 1250 टक्के भाव नोंदवला.
या शेअरमध्ये अचानक आलेल्या जबरदस्त तेजीमुळे जगभरातील लोक अचंबित झाले आहेत. सगळीकडे याचीच चर्चा आहे. अनेक लोक याबाबत चौकशी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, स्टॉक्स या नावामुळं लंडनमधील एका पत्रकाराच्या सोशल मीडिया अकाउंटवर या शेअर्स संदर्भातल्या प्रश्नांचा वर्षाव झाला आहे. या निमित्तानं लोकांचा संपर्क वाढल्यानं तिनं या नावाला धन्यवाद दिले आहेत. पत्रकार झोआ हेजेस स्टॉक्स असं तिचं नाव असून, नावात स्टॉक्स असण्याखेरिज तिचा शेअर बाजारातील स्टॉक्सशी काहीही संबंध नसल्याचं तिनं ट्विटरवर स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Share market, United states