Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा बॉम्ब भाजपने का फोडला? जाणून घ्या 5 कारणं

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा बॉम्ब भाजपने का फोडला? जाणून घ्या 5 कारणं

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत.

    मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. खरंतर एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या 39 शिवसेना आमदार आणि 11 अपक्षांनी बंड केलं, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय का घेतला? यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे ब्रॅण्ड डॅमेज करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद म्हणजे ठाकरे ब्रॅण्ड डॅमेज करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेसोबत युतीमध्ये असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंकडे राहिला असता, पण आता भाजपनेच त्यांना मुख्यमंत्री केल्यामुळे सत्तेचा हा रिमोट कंट्रोल फडणवीस यांच्याकडे राहील. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आणि यावरून वाद झाला तर निवडणूक आयोग थेट धन्युष बाण हे शिवसेनेचं चिन्हच गोठवेल आणि वादाचा निकाल येईपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला वेगवेगळं निवडणूक चिन्ह दिलं जाईल, ज्याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना निवडणुकीमध्ये बसू शकतो. उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणानंतर नुकसान टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भावनिक भाषण केलं, यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर सहानूभूती मिळाली. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला आपल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं, असा मेसेज गेला तर याचा फटका भाजपला आगामी निवडणुकांमध्ये बसण्याचा धोका होता. तसंच इमोशनल मुद्द्यावरून शिवसेना उभारी घेते, हा इतिहास आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठीही भाजपची ही रणनिती असू शकते. शिवसेनेमध्ये कनफ्यूजन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत असल्याची घोषणा केल्यानंतर पुढचा बराच काळ शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिंदेंच्या बंडाला भाजपची फूस आहे असं सांगत भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे का? असा सवाल कालपर्यंत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत विचारत होते. एवढच नाही तर भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं नाव भाजपने पुढे केल्यानंतर मात्र शिवसेना सायलेंट मोडमध्ये गेली. नेहमी माध्यमांशी बोलणारे संजय राऊत प्रतिक्रिया देण्यासाठीही पुढे आले नाहीत. शिंदेंचं नाव समोर आल्यामुळे नेमकी प्रतिक्रिया काय द्यायची, याबाबतच शिवसैनिक आणि नेत्यांमध्ये कनफ्यूजन दिसून आलं. आता हे कनफ्यूजन पुढचे काही दिवस राहिलं, तर भाजप त्यांच्या रणनितीमध्ये यशस्वी होईल. मराठा चेहरा आणि निवडणुका एकनाथ शिंदे यांना पुढे करून भाजपने जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा मोर्चे निघाले. आता एकनाथ शिंदेंच्या रुपात मराठा चेहरा देऊन भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये लढण्याची रणनिती आखली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे, याचा फायदा घेऊन शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाईदेखील त्यांना लढता येईल. सुप्रीम कोर्टाची लढाई महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असला तरी सुप्रीम कोर्टात मात्र 16 आमदारांच्या कारवाईबाबतची लढाई सुरूच राहणार आहे. 11 जुलैला यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट अपात्र ठरवण्यात आला, तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा बदलू शकतं. सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर फडणवीसांना पुन्हा एकदा राजीनामा देण्याची नामुष्कीही ओढावली असती, त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या