नाशिक, 12 मार्च : नाशिक शहरात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच नाशिकमधील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 10 वी, 12 वीचे वर्ग मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
कोरोनासंबंधित बंधनं न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कडक कारवाई होणार आहे. तसंच होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निर्बंध न पाळणाऱ्या व्यावसायिकांवरही पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं. होम आयसोलेशन मधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर त्यांना शोधून जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार, तसंच शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील कोरोना नियंत्रण उपायांबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, पालिकेच्या रुग्णालयातील एकूण बेडची क्षमता 3284 इतकी असून सध्या 327 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2957 बेड्स शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शहरात ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. वॅक्सिनचा 5 हजार डोसचा साठा आज प्राप्त झाला असून आणखी 50 हजार डोसची मागणी सरकारकडे केली आहे.
शहरात 533 प्रतिबंधक क्षेत्र आहेत. 15 दिवसात पालिकेची बिटको रुग्णालयात सॅम्पल टेस्टिंग लॅब सुरू होणार असून दररोज 2 हजार सॅम्पलची तपासणी होणार आहे. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅबकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसंच 100 टक्के लॉकडाऊनची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे, मात्र आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Nashik, Pandemic, Pune