मुंबई, 14 एप्रिल : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होण्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा मोठा गट नाराज असून तो सत्ताधाऱ्यांसोबत जाईल, असं बोललं जात आहे.
या सगळ्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार अस्वस्थ असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. अजित पवार कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात असंही दादा भुसे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही अजित पवार अस्वस्थ असल्याचा इन्कार केलेला नाही. फक्त अजित पवार निर्णय कधी घेतील याच्या प्रतिक्षेत असल्याचे संकेत एकनाथ शिंदेंनी दिलेत. एकीकडे शिवसेनेने अजितदादांबाबत संशय निर्माण केलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही अशीच प्रतिक्रिया आली. राष्ट्रवादीसोबत शिंदेंसारखेच प्रयोग करण्याचा प्रयत्न असून त्यांनाही ईडीची भीती दाखवली जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुख्य म्हणजे संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांच्या बैठकीला गेले होते. या बैठकीनंतर 48 तासांच्या आत संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान शरद पवारांनाही अजित पवार भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते कोणतंही उत्तर न देता निघून गेले.