मुंबई 20 ऑक्टोबर : यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतंच हाती शिवबंधन बांधलं आहे. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक आणि ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दहापट मोठी होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. मी पोहऱा देवीला मेळावा घ्यायचं जाहीर केलं आहे. आता मी ठाण्यात पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा. कोणतंही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहाणं योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज ठाकरेंचं आणखी एक पत्र; आताच्याही मागणीला हिरवा कंदील? बंडखोरी केलेल्या आमदारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘काहीजण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही त्यांना. का करू विनंती? तुम्ही आम्हाला संपवायला निघाला. तुम्ही आडवे गेला नसता तर दसरा मेळावा सोपा झाला असता. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असेल तर मी अजून चिडून कामाला लागतो, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘कोणी विनंती करतंय काय हे बघत होते. मग कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली. म्हणजे विनंती करण्यासाठी विनंती केली गेली. तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं, असं त्यांना वाटलं. मग माझं नाव आणि चिन्ह गोठवण्याची घाई का केली?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. माजी राज्यमंत्री संजय देशमुखांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंचा नवा डाव शिवसेनेतील प्रवेशानंतर बोलताना संजय देशमुख म्हणाले, की उद्धव ठाकरे पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत. मोठी सभा साहेब तिथे घेतील. दिवाळी झाल्यावर साहेब सभा घेतील. ही सभा ऐतिहासिक होणार आहे. उद्धवजी ठाकरे यांची श्रद्धा तिथे आहे. येत्या काळात शिवसैनिक कायम उद्धव साहेबांसोबत राहणार आहे, असा विश्वास संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.