मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबई हायकोर्टाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंद संचारला आहे. राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष सुरु झाला आहे. या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. पण मेळाव्याला येताना शिस्त पाळावी, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली आहे. “गुलाल उधळत, वाजत-गाजत या, पण शिस्तीत या. कुठेही आपल्या या तेजस्वी आणि तेजाच्या वारसाला, परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. इतर काय करतील याची मला कल्पना नाही. आपण आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहोत. या दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचच नवे तर देशासोबत जगभरातील भारतीयांचं आहे. उत्सहाता, वाजत-गाजत पण शिस्तित या”, असा आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. “शिवसेनेचे दोन गट झालेले नाहीत. आमची शिवसेना आहे तीच आहे. उलट शिवसेना वाढलेली आहे. परवाचा आमचा मेळावा हा फक्त आमच्या मुंबईच्या गटप्रमुखांचा मेळावा होता. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारवर टाकली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा याला जबाबदार राहणार आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, अशी मला आशा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ( शिवाजी पार्कचं मैदान ठाकरेंनी कसं जिंकलं? दहा मुद्द्यांमध्ये समजून घ्या कोर्टातला युक्तीवाद ) “प्रत्येकवेळा आपण वाईट विचार करु नये. आता चांगली सुरुवात झाली आहे. विजयादशमीचा पहिला मेळावा मला आठवत आहे. तीच परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मधला कोरोनाचा काळ गेला तर कधी आम्ही मेळावा चुकवलेला नाही. ती परंपरा आम्ही चालवतोय. प्रतिष्ठेचा प्रश्न त्यांनी निर्माण केला. त्यामुळे त्यांना विचारा”, अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. “मी परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा म्हणालो आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला आणि हा लोकशाहीचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयात जो वाद सुरु आहे त्याचा निकाल केवळ शिवसेनेचं भविष्य ठरवणारा राहणार नाही तर आपल्या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारं राहणार आहे. त्यामुळे देशात लोकशाही किती काळ राहील? याकडे जगाचं लक्ष आहे”, असं ते म्हणाले. ( मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार? ) “सुप्रीम कोर्टात काय होईल ते मी बोलणार नाही. माझ्या मनात न्यायदेवतेवर विश्वास आहे. असे अनेक संघर्ष आणि विजय आम्ही मिळवलेले आहेत. आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मिळेल, या भावनेने गेलो आहोत”, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.