मुंबई, 29 नोव्हेंबर : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानामुळे हे दोन्ही एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने दिली ही माहिती
वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्याबरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युतीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
वंचितची भूमिका काय -
तसेच शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्यावर बोलणी झाली आहेत की, आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार, हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होईल.
हेही वाचा - ...तर संजय राऊतांवर होऊ शकतो हल्ला? भुजबळांनी व्यक्त केली भीती, सांगितला बेळगाव लढ्याचा इतिहास
आमचे वैचारिक व्यासपीठ एक : ठाकरे
'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Prakash ambedkar, Shivsena, Uddhav Thackeray