मुंबई , 29 नोव्हेंबर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडून 2018 च्या एका प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. 2018 ला बेळगावमध्ये झालेल्या सभेत संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. एक डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहेत. सीमावादावरून राऊत यांना न्यायलयानं समन्स बजावल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. बेळागावला बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आता संजय राऊत यांच्या या आरोपावर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं भुजबळ यांनी?
संजय राऊत यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांचा डाव आहे. बेळगाव महाराष्ट्रात यायला हवं होतं. बेळगाव महाराष्ट्रात घेण्यासाठी गेले कित्येक वर्ष आंदोलन सुरू आहे. यासाठी आतापर्यंत 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं. आम्ही जरा जास्तच लोकशाहीवादी आहोत त्यामुळे ते इकडे येऊन झेंड लावत आहेत. मात्र या प्रश्नावर आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसेच राऊतांवर बेळगावात हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं देखील भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : चित्रा वाघ यांच्या सावरकरांबाबतच्या 'त्या' ट्विटवर रत्नागिरीकर आक्रमक, राष्ट्रवादीनेही दिला इशारा
संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं समन्स बजावलं आहे. त्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर गप्प का आहेत? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच कानडी संघटनांना महाराष्ट्रातून छुपा पाठिंबा आहे. पाठिंब्याशिवाय ते महाराष्ट्रात येऊन कर्नाटकचा झेंडा लावूच शकत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सीमा प्रश्नासाठी आता पुन्हा गुवाहाटीला जाऊन नवस करणार का? असा खोचक टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.