मुंबई, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टीकेमुळे राज्यपालांवर सगळ्याच पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. हा वाद वाढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत.
छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी, अन्यथा मला करावी लागेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. 'भाजपने छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांना कापून फेकून दिलं पाहिजे. भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली पाहिजे,' असा आक्रमक पवित्रा उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.
'भगतसिंग कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंग कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या परीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन,' असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार आहोत, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.
'राज्यपालांबद्दल प्रोटोकॉलनुसार बोलता येत नाही, पण...', सुप्रिया सुळेंचा अल्टिमेटम!
फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल
दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असतील. आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराजच असतील, त्यामुळे यावर वाद व्हायचं कारण नाही, असं मला वाटतं. राज्यपाल्यांच्या मनातही हे स्पष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढला जाऊ नये, असं मला वाटतं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले राज्यपाल?
'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली.
'...तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करावा'; अजित पवारांनी सुनावलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.