मुंबई 20 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, असं म्हणत अजित पवारांनी कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
राज्यपालांचं धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे रोख बक्षीस, राष्ट्रवादी कार्यकर्त्याची बॅनरबाजी
"महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे", असं पवार म्हणाले.
"राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना..." अशा शब्दात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नारायण राणेंच्या मुलाने राज्यपालांना सुनावले खडेबोल, म्हणाले....
काय म्हणाले राज्यपाल?
'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.