नवी दिल्ली, 20 जानेवारी : आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर सुनावणी करणार आहे. यापूर्वी दोनदा सुनावणी झाली आहे. आज तिसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांकडूनही पक्षाचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज चिन्ह आणि नावाबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
तीन वाजता सुनावणीला सुरुवात
आज दुपारी तीन वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयात ही सुनावणी होणार असून या सुनावणीला तीनही निवडणूक आयुक्त न्यायाधीश म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत. आज चिन्हाबाबत अंतिम निर्णय होणार की सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : PM मोदींच्या हस्ते मुंबईत ड्रायव्हरलेस मेट्रोचं उद्घाटन, जाणून घ्या कशी आहे सेवा?
काय आहे नेमकं प्रकरण?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठाव केल्यानं पक्षात फूट पडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून आमचीच शिवसेना खरी आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तसेच पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटानं दावा केला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. निवडणूक आयोगानं अंतिम निर्णय होईलपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Election commission, Shiv sena, Uddhav Thackeray