मुंबई, 20 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. 'सामना'च्या संपांदकीयमधून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा , शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही?' असा सवाल सामनामधून करण्यात आला आहे.
'निकाल महाराष्ट्राला मान्य नाही'
पुढे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, 'हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही व निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसकरे काय होणार? लढाई सुरूच राहील. शिवसेना हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे. शेंगदाणे विकत घ्यावेत अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा निकाल विकत घेतला हे आता लपून राहिलं नाही', असा आरोपही सामनामधून करण्यात आला आहे.
अमित शाहांवर निशाणा
दरम्यान सामनाच्या संपादकीयमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. 'शिवजयंतीच्या निमित्तानं गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी मिंध्यांना शिवसेना - धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वत:चा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल' असं सामनामध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Eknath Shinde, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray