मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन

संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, सांगलीतील राहत्या घरी निधन

संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

संपकरी एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

ST employee died due to heart attack: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच दुसरीकडे एका एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

सांगली, 11 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST employees Strike) संपणार तरी कधी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आपल्या मागण्यांवर एसटी कर्मचारी ठाम असून हा संप काही मिटण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता एका एसटी कर्मचाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील राहत्या घरी या कर्मचाऱ्याचं निधन झालं आहे. (ST Employee died due to heart attack in Sangli)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील असे मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेंद्र पाटील हे सांगलीतील आपल्या राहत्या घरी असताना आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप आणि त्यातच सुरु करण्यात आलेली निलंबनाची करावाई या सर्वांमुळे राजेंद्र चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.

एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासनाने एसटी कर्मचारी आर एन पाटील यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी पुढे येत आहे.

मृत आर एन पाटील हे 17 वर्षांपासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते. एसटीच्या संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर ते गेली तीन दिवस आंदोलनाकडे आले नाही. या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. तर आपल्या नोकरी बाबत ते सतत सर्वांशी बोलत चर्चा करत असायचे. एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते. आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हीलला दाखल केले मात्र त्याठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगली सिव्हीलला धाव घेतली. तसेच मृत वाहक आरएन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मृत पाटील हे एसटी संपाच्या तणावाखाली होते यातूनच त्यांना त्रास झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घ्या आणि सहकार्य करण्याचं म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका असंही विरोधकांना म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, आज तिसऱ्या दिवशीही निलंबनाची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचं सत्र थांबवा अशी एक अटच संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली.

यावेळी कामगारांकडून राज ठाकरेंना आश्वासन देण्यात आलं आहे की, यापुढे एकही कामगार आत्महत्या करणार नाही. परंतू ही परिस्थिती म्हणजेच विलगीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एक आयोग करावा आणि राज्य सरकारच्या वाहन चालकांना जे वेतन मिळत आहे तेच वेतन एसटीच्या चालकांना आणि वाहकांना मिळावं अशी मागणी केली.

First published:

Tags: Heart Attack, Sangli, Strike