Home /News /mumbai /

St Employees Strike: 'आत्महत्या करू नका' एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

St Employees Strike: 'आत्महत्या करू नका' एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

Raj Thackeray on St Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees Strike) अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच आहे. याच दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेतली. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंनी आत्महत्या करु नका असे कळकळीचं आवाहनही केलं. (Raj Thackeray appeal to ST employees delegation do not suicide) एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंनी आत्महत्येच्या घटनांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचं सत्र थांबवा अशी एक अटच संपकरी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली. यावेळी कामगारांकडून राज ठाकरेंना आश्वासन देण्यात आलं आहे की, यापुढे एकही कामगार आत्महत्या करणार नाही. परंतू ही परिस्थिती म्हणजेच विलगीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एक आयोग करावा आणि राज्य सरकारच्या वाहन चालकांना जे वेतन मिळत आहे तेच वेतन एसटीच्या चालकांना आणि वाहकांना मिळावं अशी मागणी केली. राज ठाकरेंची भेट घेतल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही राज ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालतो असे आम्हाला सांगितलं आहे. हा प्रश्न ते मिटवतील असा आम्हाला विश्वास आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कालच (10 नोव्हेंबर 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळकळीचे आवाहन करत आंदोलन मागे घ्या आणि सहकार्य करण्याचं म्हटलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन राजकीय पोळ्या भाजू नका असंही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Raj Thackeray, ST, Strike

    पुढील बातम्या