सोलापूर, 12 फेब्रुवारी : काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोण रोहित पवार असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी मात्र आपण प्रणिती शिंदे यांना ओळखतो, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे असं म्हटलं होतं. मात्र हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी हाच मुद्दा पकडत प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले बाबर? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची कारकिर्द जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झाली. त्यामुळे रोहित पवार यांच्यावरील टीका राष्ट्रवादी कधीही खपवून घेणार नाही. उलट पवार कुटुंबामुळेच शिंदे घराण्याची ओळख आहे. सुशिलकुमार शिंदे यांना विचारा पवार कुटुंब काय आहे . प्रणिती शिंदे यांच्या अशा स्टेटमेंटमुळे त्यांचे सीट धोक्यात येऊ शकते. सुशिलकुमार शिंदे यांना आमदारकीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्यामध्ये पवार कुटुंबीयांचाच हात असल्याचं प्रशांत बाबर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : ‘भाजप नेत्यांना खोट्या गुन्हात अडकवण्यासाठी..’ शंभुराजे देसाईंचा मोठा खुलासा, म्हणाले फडणवीस शिंदे यांना राष्ट्रवादीने लीड दिली ते पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांना लीड होती. मात्र तुमच्या मतदारसंघातून 33 हजार मतांनी दुसरे उमेदवार आघाडीवर होते. याचं चिंतन करण्याऐवजी तुम्ही रोहित पवार यांच्यावर टीका करत आहात, असा टोलाही बाबर यांनी शिंदे यांना लगावला आहे. तसेच प्रणिती शिंदे या निवडून येण्यासाठी मतदारसंघातून काँग्रेस संपवण्यात आले असा घणाघातही बाबर यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.