झाडातून घळाघळा वाहतंय पाणी, झाड रडत असल्याची गावकऱ्यांची भावना; पाहा VIDEO

झाडातून घळाघळा वाहतंय पाणी, झाड रडत असल्याची गावकऱ्यांची भावना; पाहा VIDEO

देवाची करणी अन् नारळात पाणी ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत मात्र सोलापुरात (Solapur)काही वेगळाच प्रकार पाहायला मिळतो आहे. कारण इथे नारळ आहे ना नारळाचे झाड आहे, मात्र तरीही झाडाच्या फांदीतूनच पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत.

  • Share this:

सोलापूर, 14 मार्च: देवाची करणी अन् नारळात पाणी ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत मात्र सोलापुरात (Solapur)काही वेगळाच प्रकार पाहायला मिळतो आहे. कारण इथे नारळ आहे ना नारळाचे झाड आहे, मात्र तरीही झाडाच्या फांदीतूनच पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यामुळे सोलापुरातील या अद्भूत घटनेमुळे झाड रडत असल्याची अंधश्रद्धा (Crying Tree Superstition) पसरत वेगाने पसरत आहे. सोलापूर शहरातील बाळीवेस भागातल्या गांधीनाथा शाळेसमोरील एका शेकडो वर्ष जुन्या असणाऱ्या झाडाच्या फांदीतून अचानक पाण्याच्या धारा वाहत आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून या झाडातून पाण्याच्या मोठ्या धारा सुरू झाल्या. बाळीवेस भागातील हे झाड जवळपास 100 वर्षे जुनं असल्याचे स्थानिक सांगतात.

काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्ताने या झाडाची फांदी तोडण्यात आली होती. त्यानंतर आज त्या अर्ध्या राहिलेल्या फांदीतूनच अचानक पाण्याच्या धारा सुरू झाल्या आहेत. हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जवळपास एक ते दीड तास पाण्याच्या धारा या झाडाच्या फांदीतून वाहत होत्या. त्याखाली ठेवलेली मोठी बादलीदेखील भरून वाहू लागल्याचे स्थानिकांनी सांगतले.

(हे वाचा-दगड खाणारे आजोबा! दररोज 250 ग्रॅम खडे खाऊन दूर केला हा आजार)

तर याबाबत ‘NEWS18 लोकमत’ने दयानंद महाविद्यालयाचे बॉटनी शाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. एन. जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अशी माहिती दिली की, हा कोणत्याही अंधश्रध्देचा प्रकार नाही आहे किंवा झाड रडते आहे असे देखील नाही. ही ती एक सर्वसाधारण प्रक्रिया आहे. प्रत्येक झाडामध्ये जलवाहिन्या असतात. झाडाची मुळं जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि तेच पाणी झाडाच्या फांद्या आणि फुलापर्यंत पोहोचते. ही निरंतर प्रक्रिया आहे.

(हे वाचा-बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक)

ते पुढे म्हणाले की, सोलापुरातील या झाडामध्ये पाणी वाहण्याचे कारण आहे की, ते झाड जुने असून त्याच्या फांदीचा भाग कुजला आहे. त्यामुळे जलवाहिन्या खुल्या झाल्या आहेत. त्या जलवाहिन्या खुल्या झाल्यामुळेच हे पाणी वाहत आहे. या झाडाचं नाव सावर असून ते मोठ्या प्रमाणात कोकणात मात्र सोलापुरातही अनेक ठिकाणी आढळून येते. त्यामुळे झाड रडत आहे वगैरे अशाप्रकारची कोणतीही अफवा लोकांनी पसरवू नये तसेच त्या झाडाची कोणत्याची प्रकारची पुजा करून त्यावर हळदी-कुंकू वगैरे वाहू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. जे पाणी वाहतं आहे, ते केवळ पाहण्याचा आनंद घ्यावा असं ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांनीही याकडे अंधश्रध्देने न पाहता निसर्गाचा एक चमत्कार म्हणून त्याचे निरीक्षण करावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 14, 2021, 8:13 AM IST

ताज्या बातम्या