मुंबई 16 सप्टेंबर : भाजपचं यश हे विरोधकांमुळेच असल्याचा दावा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या यशाचे श्रेय विरोधकांचे जे विखुरलेपण आहे, त्या बेकीस द्यायला हवे. विरोधक एकीची वगैरे भाषा बोलतात, पण ते योग्य वेळी जणू ठरवून एकमेकांचा हात सोडतात. आताही 2024 ला सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे यावर बैठका, चर्चा, भेटीगाठी यांना बहर आला आहे. मात्र प्रश्न इतकाच आहे की, प्रत्येक जण वेगवेगळ्या तोंडाने का बोलतोय? एकमुखाने का बोलत नाही? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
अग्रलेखात काय म्हटलंय -
शरद पवार हे देशाच्या राजकारणातले सध्याचे पुराणपुरुष आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन दिल्लीत पार पडले. पवारांनी त्यांच्या भाषणात देशातील सर्व भाजप विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपला केंद्रातून सत्ताभ्रष्ट करण्यासाठी बिगरभाजप पक्षांनी एकत्र यावे असे पवार यांनी स्पष्टच सांगितले. विरोधकांना गप्प करण्यासाठी मोदी सरकार ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करीत आहे व या संकटांशी एकत्रित सामना करावा लागेल असे पवार यांनी सांगितले ते खरेच आहे.
'मराठवाडा मुक्ती संग्राम'वरून राजकीय नाट्य, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम बदलला, शिवसेनेचा विरोध
पवार हे दिल्लीत असे षड्डू ठोकत असतानाच तिकडे हैदराबादेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट झाली. त्या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी ‘‘भाजपमुक्त भारत असा संकल्प आपण सोडलेला आहे व त्यासाठी केंद्रात भाजपविरोधी आघाडी स्थापन करू. त्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना करू,’’ असा फटाका फोडला. राव हे अलीकडे पाटण्यात जाऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटले होते. त्याआधी ते मुंबईत येऊन आम्हाला भेटले होते. त्यावेळी त्यांनी 2024 च्या लढ्य़ाची योजना आमच्या समोर ठेवली होती. अर्थात चंद्रशेखर राव यांची भूमिका स्पष्ट आहे व त्यांनीही भाजपच्या ईडी-सीबीआयच्या दुरुपयोगाविरोधात आवाज उठवला आहे, पण विरोधकांना एकत्र आणण्यासाठी ते स्वतःचा नवा राष्ट्रीय पक्ष का स्थापन करीत आहेत? त्या पक्षाच्या छत्राखाली ते कोणाला घेणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
'मुलासाठी बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला केलं, आता ते असते तर...'; शिंदे गटातील आमदारांना टोला
महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर लोकसभेच्या 35 जागा जिंकेल असे राज्याचे वातावरण आहे. जम्मू-कश्मीरात गुलाम नबी आझाद व महाराष्ट्रात शिंदे गट भाजपच्या फायद्यास येणार नाही, याबाबत कुणाच्या मनात शंका नाही. मात्र विरोधक 2024 चे लक्ष्य ठेवतात व वेगवेगळय़ा तोंडाने भाजपवर तोफा उडवतात, हा खरा प्रश्न आहे. देश भाजपमुक्त होईल की नाही हे आता सांगता येत नाही, पण विरोधी पक्ष एकीने राहिले नाहीत तर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचणे अवघड होईल, हे कसे नाकारता येईल? भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे.
त्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपले राज्य सांभाळले तरी पुरे. आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? वगैरे नंतर पाहता येईल. आधी ‘ईडी-पीडा’ टळावी यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल. ‘शंभर आचारी रस्सा भिकारी’ असे घडू नये. विरोधकांच्या ऐक्याची खिचडी न पकणे, विरोधकांची दहा तोंडे हेच भाजपचे बलस्थान आहे. बाकी सर्व झूठ आहे!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackeray