मुंबई, 29 सप्टेंबर: संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का? अशा चर्चेला उधाण आलं असताना राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं वक्त्यव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधीच्या निवडणुकीच्या वक्तव्याचं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खंडन केलं आहे. हेही वाचा.. नागपुरात प्रियकरासमोरच अल्पवयीन मुलीवर तिघांकडून गॅंगरेप ‘आमचं सरकार 5 वर्षे पूर्ण करणार आहे. चंद्रकांत पाटील 11 कोटी जनतेची भावना बोलले. राज्यात मध्यावधी निवडणुका घ्यायच्याच असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, असा मिश्किल टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं सकारात्मक दृष्टीने पाहतोय. ते नेहमीच त्यांच्या भूमिका सकारात्मक मांडत असतात, ते म्हटले की, मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल तर स्वागत आहे. ‘सामना’ च्या सर्व मुलाखती ‘अनकट’च असतात आणि देवेंद्र फडणवीसांची मुलाखत ही देखील ‘अनएडिटेड’च असेल, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत. ‘मुलाखतीची तारीख ठरवण्यासाठी फडणवीसांना पुन्हा भेटणार आहे. त्याचबरोबर अमित शाह आणि राहुल गांधींचीही मुलाखत घेणार असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं. आम्ही जरी भेटत नसलो तरी चर्चा सुरू असते. संजय राऊत म्हणाले, राजकीय पक्षांमध्ये संवाद असलाच पाहिजे. विरोधकांशी जास्त संवाद ही बाळासाहेबांची शिकवण आहे. दरम्यान, बिहार निवडणूक लढण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंच्या राजकीय प्रवेशावर टीका करणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यावर आक्षेप आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊतांनी यावेळी हल्लाबोल केला. दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील, असं ते म्हणाले. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणूका कोणालाच नको आहेत. मध्यावधी निवडणूका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील पण शेवटी कोणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,’ असं वक्तव्य केलं होतं. हेही वाचा.. चरस आणि एमडी ड्रग्सचा साठा जप्त, औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे… - माझ्या सर्व मुलाखती या अनकटच आणि अनएडिटेड असतात. राहूल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणाराय - त्यांना जरा भेटलो तरी वादळ निर्माण झालंय. भेटीवरून कुणी नाराज असेल असं वाटत नाही. संकेत द्यायचे आहेत ते वर्षापूर्वी दिलेत. राजकीय विचारांचे नाहीत, त्यांना भेटू नये असा कायदा आहे का ? - संवाद हा राजकीय पक्षांमध्ये हवाच. - राजकीय भूकंप वगैरे होत नाहीत, चंद्रकांत पाटील म्हटले की पहाटे परत भूकंप होणार. त्यांनी गजर लावून ठेवलाय की माहिती नाही - शिवसेना बिहार निवडणूक लढणार की नाही यावर तिथल्या राजकीय पक्षांचे भविष्य नाही. आमच्या लढण्याचा त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. लवकरच यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा होईल - गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, हा आक्षेप आहे.निवडणूक लढावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण यासाठी केला होता का अट्टाहास, हा खरा प्रश्न आहे. - सुशांत सिंह प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आपले दात उचकटले होते, त्यांचे दात घशात जातील. याची मला खात्री आहे. यात सेनेच्या केसालाही धक्का लागला नाही. - महाराष्ट्राची बदनामी कुणी करत असेल तर गप्प बसणार नाही - राग व्यक्त करायला हवा, तरूण आहेत त्या.राग व्यक्त चांगल्या मानसिकतेचे लक्षण आहे, फक्त त्यात विकृती नसावी. (कंगना नवे ट्विटवर) - कृषी विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.