मुंबई, 13 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार असल्याचे संकेत मागच्या काही दिवसांमधल्या घटनांमुळे मिळत आहेत. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय. जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. महाविकासआघाडीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मंगळवारी सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतही उपस्थित होते. या बैठकीला 48 तास होत नाहीत तोच त्या बैठकीला उपस्थित असलेल्या संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. भाजपबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते, असा खुलासाच आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्याला दुजोरा देताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतही असाच प्रकार सुरू असल्याचं विधान केलं.
मला तुरुंगात जायचं नाही, जेलमध्ये जायचं नाही. मला अटकेची भीती वाटते, असं मातोश्रीवर येऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल, तर ते सत्य आहे. अशाप्रकारची चर्चा त्यांनी माझ्यासोबतही केली होती. आम्ही त्यांना वारंवार समजावत होतो, आपण प्रसंगाला सामोरं जाऊ. आपण लढणारे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. माझ्यावरही असा प्रसंग येईल मला अटक होईल, पण मी अटकेच्या तयारीत आहे, असं मी त्यांना म्हणाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
‘त्यावेळी जे आमदार-खासदार निघून गेले, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरूनच गेले आहेत. आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.