मुंबई, 29 डिसेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 14 महिन्यांनंतर जामिनावर सुटका झाली. बुधवारी अनिल देशमुख जेलबाहेर आले. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते जेलबाहेर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं. जेलबाहेर येताच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. तसेच त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल 14 महिन्यांनी जामीन मिळाला. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका झाली. आपल्या सहकाऱ्यांना खूप यातना सोसाव्या लागल्या. अशा प्रकारच्या यातना आणखी कुणावर सोसण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Anil Deshmukh : जेलबाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, या दोघांना धरलं जबाबदार
'पंतप्रधानांशी बोलणार'
सत्तेचा वापर कसा होतो त्याचं हे उदाहरण आहे. अनिल देशमुख यांच्यासारखा इतर कुणावर अत्याचार होऊ नये यासाठी गरज पडल्यास मोदींची भेट घेऊ. मी आणि संसदेचे काही सीनियर सहकारी गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहोत. आमच्या काही सहकाऱ्यांना यातना सोसाव्या लागल्या. इतरांवर ही स्थिती येऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव उघड करा; खडसेंचा रोख नेमका कोणाकडं?
मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यावर रिव्ह्यूची मागणी
पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यावर रिव्ह्यू घ्यावा, अशी मागणी होत आहे. पण आम्ही तशी मागणी करत नाही. आम्ही संसदेत आहोत. त्यामुळे संसदेतील आणखी काही सहकाऱ्यांना घेऊन त्यासंबंधी काही योजना आणता येईल का? यासाठी प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी आम्ही कामाला देखील सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, NCP, Sharad Pawar