मुंबई, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का दिला आहे. विधानसभेमध्ये आज मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हे विधेयक मंजूर करून घेताना काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही शिवसेनेला एकटं पाडलं. 3 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना ठेवण्याचा अध्यादेश काढला. यानंतर आता या अध्यादेशाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करून घेण्यात आलं. वॉर्ड रचनेमध्ये सुधारणा केल्यामुळे आता महापालिकेत 236 सदस्यांऐवजी 227 सदस्यसंख्या होईल. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या वॉर्ड पुर्नरचनेमुळे मुंबई महापालिकेची संख्या 236 झाली होती. या पुर्नरचनेवर काँग्रेससह भाजपनेही आक्षेप घेतला होता, एवढच नाही तर काँग्रेसने याविरोधात कोर्टातही याचिका दाखल केली होती. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाविकासआघाडी सरकारने केलेली मुंबई महापालिकेची वॉर्ड पुनर्ररचना पुन्हा बदलावी, अशी मागणी केली होती. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी मुंबईतल्या वॉर्डमध्ये बदल केल्याचा आरोप काँग्रेस-भाजपने केला होता. राष्ट्रवादी-शिवसेनेचा विरोध दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. सुप्रीम कोर्टाने स्थिती जैसे थे ठेवायला सांगितली असल्याचा दाखला दोन्ही पक्षांकडून देण्यात आला, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-राष्ट्रवादीचा हा दावा खोडून काढला. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली परिस्थिती जैसे थे ठेवायला सांगितली आहे. आमचा हा अध्यादेश मुंबई महापालिकेच्या वॉर्डची संख्या 236 वरून 227 करण्यासाठीचा आहे, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.