नवी दिल्ली, 27 मार्च: राज्यांमध्ये सध्या विविध कारणांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच गेल्या आठवड्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एक बॉम्बगोळा टाकला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद (UPA President) शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्याची आवश्यकता आहे, असं मत त्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केलं होतं. राऊतांचं हे विधान काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना झोंबलं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) या सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष असून त्यांना बदलवण्याचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे युपीएचे अध्यक्ष बदलण्याबाबत जे बोलत आहेत, त्यांनी प्रथम युपीएचा घटक पक्ष म्हणून सामील व्हावं, असा सल्ला काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांनी दिला आहे. यावरून आता काँग्रेस आणि शिवसेना मध्ये युपीए अध्यक्षपदावरून कलगीतुरा रंगला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षासोबत लढण्यासाठी तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष विरहित इतर राजकीय पक्षांची एक तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. याच मताची री ओढत शिवसेना नेता संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या सारख्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्याला संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेसमधील अनेक नेते हे शरद पवार यांच्या नावाला पसंती देतात. आतापर्यंत सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष होत्या. पण सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे त्या युपीएसाठी फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी शरद पवार सर्वात योग्य आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. हे ही वाचा- राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना संजय राऊत यांची डिनर डिप्लोमसी सध्या काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा जी23 हा एक राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गट बनला आहे. यातील एका नेत्याने तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी ट्विट करत म्हटल की, ‘युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच अध्यक्षा राहतील. आपल्या ट्विटमध्ये राजीव सातव पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या काही कळीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.