मुंबई : संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं समन्स बजावला आहे. 2018 मध्ये त्यांनी बेळगावात सीमावादावरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. यावरून आता त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना एक डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमावादावर काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर कधी कारवाई होणार?सीमा प्रश्नासाठी आता मुख्यमंत्री पुन्हा आसामला जाऊन नवस बोलणार आहेत का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सीमा प्रश्नावर एकनाथ शिंदे गप्प का आहेत. त्यांना सीमा प्रश्नाबाबत काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर केव्हा कारवाई होणार, राज्यातील काही जणांचा कन्नड रक्षण वेदिकेला छुपा पाठिंबा मिळतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान या सरकारला महाराष्ट्राचा अभिमान नाही. पाठिचा कणा नाही आणि स्वाभिमान देखील नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता सीमा प्रश्नावर पुन्हा एकदा नवस बोलण्यासाठी आसामला जाणार आहात का असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा : ...म्हणून भाजप, शिंदे गटाला पाठिंबा, संजय पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; खडसेंवरही साधला निशाणा
काश्मीर फाईल्सवरून भाजपावर हल्लाबोल
काश्मीर फाईल्स हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी नाव न घेता भाजपावर हल्लाबोल केला. काश्मीर फाईल्स हा चित्रपट एका पक्षाचा प्रचार करण्यासाठी तयार करण्यायत आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले. मात्र काश्मीरवरील हल्ले थांबले का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Sanjay raut