सांगली, 10 जुलै: गेल्याच महिन्यात टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो बांधावर फेकून दिल्याच्या तसेच बाजारात ओतून आल्याच्या आणि टोमॅटोच्या शेतावर ट्रॅक्टर फिरवल्याच्या बातम्या पाहिल्या. आज बाजारात याच्या अगदी उलट स्थिती आहे. आज शेतकऱ्यांच्या रानात अगदी कमी प्रमाणात टोमॅटो आहे आणि त्याला 100 ते 125 रुपये इतका चांगला दर मिळत आहे. वरकरणी शेतकऱ्यांना यातून चांगला दर मिळत असेल असा आपला ग्रह होऊ शकतो, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. याबाबत सांगलीतील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनीच माहिती दिली आहे. शेतकरी बेहाल, व्यापारी मालामाल सध्या बाजारात टोमॅटोला चांगला भाव मिळत असून बाजार दरात तेजी आहे. अगदी 120 रुपये वर किलोचा भाव गेलाय. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यापारी हा टोमॅटो 40 ते 50 रुपये किलोने विकत घेतात आणि बाजारात आणून 120 रुपये किलोने सर्वसामान्य ग्राहकांना विकतात. मधल्या मध्ये ते 60 ते 80 रुपयांचा नफा कमवतात. हा नफा इतका असतो की ज्या शेतकऱ्याने ते पीक घेताना जितका खर्च आला त्यापेक्षा जास्त नफा व्यापारी कमावतात. म्हणजेच पिकवणारा शेतकरी बेहाल तर व्यापारी मालामाल झाल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना पाहिजे हमीभाव आता या परिस्थितीवर उपाय काय? तर शासनाने शेतमालाला हमीभाव मिळवून द्यायला हवा. किंवा शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे शेतकऱ्यांना जादा भाव मिळेल. त्यांना चांगला फायदा मिळेल आणि सरकारला परकीय चलन मिळेल. सरकारने आता व्यापाऱ्यांची साथ सोडून मायबाप अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांना साथ दिली तरच शेती हा व्यवसाय टिकणार आहे. ज्यावर भारताची 65% अर्थव्यवस्था अवलंबून आहे, असे शेतकरी म्हणतात. Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, पाहा कसा असावा आहार? सर्वसामान्यांच्या आहारातून टोमॅटो गायब टोमॅटोच्या घरगुती वापरा बरोबरच हॉटेल व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अनेक पदार्थांची लज्जत टोमॅटोशिवाय वाढत नाही. पण भरमसाठ दरवाढीमुळे सर्वसमान्यांच्या आहारातून टोमॅटो गायब झाला आहे. तर सांगलीतील एका मोठ्या हॉटेलने ग्राहकांसाठी परिपत्रक काढून टोमॅटो बाजारात उपलब्ध नसल्याने पदार्थांमध्ये वापरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व बाबी पाहता शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी यामध्ये आता सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव देऊन त्यांची व्यापाऱ्यांच्या जोखडातून मुक्तता केली पाहिजे. तरच शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल, असे शेतकरी म्हणतात.