मुंबई, 26 जानेवारी, असिफ मुरसल : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. माझं पूर्वीपासून मत आहे, शरद पवार हे भाजपचे आहेत. तुम्ही डोळे झाकून चालला आहात, पण माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं आंबेडकर यांनी म्हटलं होतं. तसंच आपली युती ही ठाकरे गटासोबत आहे, महाविकास आघाडीसोबत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये पूर्वीपासूनच ठरलं आहे. जेवढे मित्रपक्ष येतील तेवढे जमा करून मविआची ताकद वाढवायची. उद्या राष्ट्रवादी देखील काही नवीन मित्र जोडू शकतो. मात्र या पक्षांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलू नये, असं केल्यास मतदारांचा गोंधळ होतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि आजित पवार यांनी 2019 ला पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसेच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jayant patil, NCP, Prakash ambedkar, Sharad Pawar, Shiv sena, Uddhav Thackeray