स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 7 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातील पहिली मॉडेल स्कूल ठरली आहे. शाळेतील शिक्षक तारिष आब्बास अत्तार यांच्या नवोपक्रमाची राज्यभर चर्चा आहे. 'गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा' या उपक्रमातून ते दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून स्कॉलरशिपचे शिक्षण देत आहेत. कोरोना काळात सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली असून आत्तार यांचे कौतुक होत आहे.
कोरोना काळात सुरुवात
गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा हा अभिनव उपक्रम कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुरू झाला. जून 2020 मध्ये राज्यात लॉकडाऊन असताना आत्तार यांनी खरशिंगच्या जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाची सुरुवात केली. शाळा बंद असताना पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे ऑनलाईन शिक्षण देण्यात येऊ लागले. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने शिक्षणात व्यत्यय येऊ लागला. तेव्हा गावातील आणि गल्लीतील एका मोबाईलवर पाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली.
दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण
गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा या उपक्रमात राज्यभरातील विद्यार्थी जोडले जात आहेत. आत्तार हे दूर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत. यामध्ये गडचिरोली, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, सांगली जिल्ह्यातील दूर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाकडून दखल
कोरोना लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना एका जिल्हा परिषद शिक्षकाने सुरू केलेल्या अभिनव उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली. गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा माध्यमातून 75 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. राज्य शासनाने या उपक्रमाचे कौतुक करत शासकीय परिपत्रकात 'गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा' या उपक्रमाचा समावेश केला.
लहानपणीचा सुविचार लेखनाचा छंद कसा बनला समाज परिवर्तन घडवणारा उपक्रम, पाहा Video
नवोपक्रमाचे राज्यभरातून कौतुक
कोरोनाच्या काळात शिक्षण कार्यात खंड पडू नये म्हणून सुरू केलेल्या या नवोपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.आत्तार यांना सर फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम पुरस्कार मिळाला. यामध्ये गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा या दोन उपक्रमाला पसंती देण्यात आली. तसेच राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही त्यांना सन्मानित करण्यात आले.
Beed : बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अनोखी तयारी, Group study नं वाढवली अभ्यासाची गोडी!
समाजाचे देणे लागते म्हणून..
कोरोनाच्या कालखंडात राज्यभरासह भारतातील सर्व शिक्षण संस्था बंद होत्या. तेव्हा समाजाचे काहीतरी देणे लागते आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करून गल्लीमित्र आणि ऑनलाईन कट्टा उपक्रम सुरू केला. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सांगलीचे निवृत्त उपशिक्षणाधिकारी आर जी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच पत्नी अंजुम अत्तार, जिल्हापरिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया शिंदे, सहकारी साहेबलाल तांबोळी, अन्नाप्पा शिंदे, संगीता कोरे, प्रभा सुतार यांच्यासह राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आत्तार यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Inspiring story, Local18, Online education, Sangli, Sangli news, School teacher, Teacher