मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र / Sangli News: दुष्काळग्रस्त लातूरकरांची तहान भागवलेली मिरजेतील ऐतिहासिक विहीर संकटात, Video

 Sangli News: दुष्काळग्रस्त लातूरकरांची तहान भागवलेली मिरजेतील ऐतिहासिक विहीर संकटात, Video

X
मिरजेमध्ये

मिरजेमध्ये आदिलशाही काळातील ऐतिहासिक हैदरखान विहीर आहे. या विहिरीतून 2016 मध्ये दुष्काळग्रस्त लातुरला रेल्वेने पाणीपुरवठा केला होता.

मिरजेमध्ये आदिलशाही काळातील ऐतिहासिक हैदरखान विहीर आहे. या विहिरीतून 2016 मध्ये दुष्काळग्रस्त लातुरला रेल्वेने पाणीपुरवठा केला होता.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Sangli Miraj Kupwad, India

  स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी

  सांगली, 20 मार्च: महाराष्ट्रातील काही भागात 2016 साली दुष्काळ पडला होता. तेव्हा सांगली जिल्ह्यातील एका ऐतिहासिक विहिरीने लातूरकरांची तहान भागविली होती. विशेष म्हणजे मिरजेतील ही विहीर तब्बल 500 वर्षे जुनी असून आदिलशाहीच्या काळातील आहे. आता हीच हैदरखान विहीर संकटात असून तिची दुरावस्था झाली आहे.

  ऐतिहासिक हैदरखान विहीर

  मिरज शहराला मोठा ऐतिहासक वारसा असून अनेक वास्तू त्याची साक्ष देत असतात. येथेच आदिलशहाच्या काळात सरदार हैदरखान याने एक विहीर बांधली. सन 1583 मध्ये बांधलेल्या या विहिरीला हैदरखान विहीर म्हणूनच ओळखले जाते. या विहिरीतून आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. पुढे संस्थान काळातही या विहिरीच्या पाण्यावर मिरजेत शेती केली जात असल्याचे पुरावे आढळतात.

  मिरासाहेब दर्ग्यातील कारंजाला पाणी

  हैदरखान विहिरीतून एक दगडी पाईपलाईन मिरज शहरातील मिरासाहेब दर्ग्यात आणली होती. या ठिकाणी आणलेल्या पाण्याचे कारंजे तयार करण्यात आले होते. त्यासाठी विहिरीवर हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीमध्ये हत्तींना बांधण्यासाठी दगडी अंकुशही तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजही ते सुस्थितीत आहेत.

  1887 मध्ये हैदरखान विहीर रेल्वेच्या ताब्यात

  एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मिरजेत रेल्वे पोहोचली. तेव्हा 1887 मध्ये हैदरखान विहिरीचा ताबा रेल्वेकडे आला. रेल्वेचे डबे धुणे, स्टेशनची स्वच्छता करणे यासारख्या कामांसाठी हैदरखान विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता.

  Sangli : हिंदू -मुस्लीम ऐक्याची 700 वर्षांची परंपरा जपणारा मिरजेतील दर्गा! पाहा Video

  दुष्काळात लातूरच्या मदतीला

  सन 2016 मध्ये मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. लातूरला तीव्र पाणी टंचाई होती. तेव्हा मिरजेतील स्थानिक नेते मकरंद देशपांडे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक योजना मांडली. मिरजेतील हैदरखान विहिरीतून लातूरला पाणी नेण्याच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

  जलपरी एक्स्प्रेस धावू लागली

  दुष्काळग्रस्त लातूरला मिरजेतून पाणी पुरवठा करण्याची योजनेला मान्यता मिळाली. त्यासाठी रेल्वेने हैदरखान विहिरीतील पाणी लातूरला नेण्यात येणार होते. रेल्वेनेही त्यासाठी परवानगी दिली. जलपरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून रोज लाखो लिटर पाणी लातूरला पोहोचवले जावू लागले. सलग 4 महिने हैदरखान विहिरीतून लातूरला पाणीपुरवठा होत होता. 500 वर्षे जुन्या असणाऱ्या हैदरखान विहिरीने लातूरकरांनाची तहान भागविली.

  Video : 9 वीच्या मुलानं बनविली 'बग्गी' कार, इलेक्ट्रिक गाडीची सांगलीत चर्चा

  हैदरखान विहीर संकटात

  शेकडो वर्षांपासून कित्येकांची तहान भागविणारी हैदरखान विहीर आता संकटात आहे. आसपासच्या लोकांनी विहिरीची कचराकुंडी केल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने ते पडण्याच्या स्थितीत आहेत. विहिरीची दुरावस्था झाल्याने ती अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष आहे.

  विहिरीची देखभाल करण्याची मागणी

  हैदरखान विहिरीत कचरा टाकणाऱ्या उपद्रवी लोकांवर शासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. या विहिरीचा पाणी उपसा वेळोवेळी केला पाहिजे. तसेच विहिरीची स्वच्छता करून वेळीच दुरुस्ती केली पाहिजे. नाहीतर विहिरीचे डबके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शहरातील हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती इतिहास अभ्यासक व्यक्त करत आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Latur, Local18, Sangli, Sangli news