स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 24 मार्च: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली. सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलातील पतंगराव कदम क्रिडा नगरीमध्ये या स्पर्धा होत असून 43 संघांमध्ये 260 हून अधिक महिला मल्ल या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. तर आज शुक्रवारी महिला महारष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे.
पहिली कुस्ती 50 किलो वजनी गटात
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन 50 किलो वजनी गटाच्या कुस्तीने झाले. रायगडची भूमिका खंडा विरुद्ध नागपूरच्या रुपाली मातवडकर या दोघींमध्ये लढत झाली. यामध्ये रुपालीने 7-0 ने भूमिकाला मात दिली. तर दुसरी कुस्ती अहमदनगरची दूर्गा शिरसाट आणि साताऱ्याची श्रेया मंडले यांच्यात झाली. यामध्ये श्रेयाने 12-0 ने विजय मिळवला.
महिला महाराष्ट्र केसरीसाठी 17 मल्ल भिडणार
महिला महाराष्ट्रर केसरी स्पर्धा विविध वजनी गटात होत आहेत. मात्र, 65 ते 76 या खुल्या वजनी गटातून पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळणार आहे. या गटातून 17 मल्ल लढणार आहेत. सातारची धनश्री मान आणि धुळ्याची शर्मिला नाईक यांच्याकडे महिला महाराष्ट्र केसरीची दावेदार म्हणून पाहिले जात आहे. तर सांगली जिल्ह्यातील महिला मल्लांचेही पहिल्या महाराष्ट्र केसरीचा मान पटकावण्यासाठी प्रयत्न असणार आहेत.
Video : तापानं फणफणत असतानाही पृथ्वी शॉने जिंकून दिली होती मॅच, पाहा Untold Story
पहिल्या दिवशी झालेल्या प्रमुख कुस्ती
पहिल्या दिवशी विविध वजनी गटाच्या कुस्ती झाल्या.
50 किलो गटातून रुपाली मानावकर नागपूर विजयी विरुद्ध भूमिका अस्वले रायगड, श्रेया मांडवे विजयी विरुद्ध दूर्गा शिरसट अहमदनगर, सलोनी डिसले विजयी विरुद्ध तनुजा डोईफोडे पुणे,
55 किलो गटातून शहनाज शेख नागपूर विजयी विरुद्ध शितल खरात ठाणे, अंजली गजभिये नागपूर विजयी विरुद्ध स्वाती गवळी रत्नागिरी, विश्रांती पाटील कोल्हापूर विजयी विरुद्ध नेहा मडके सांगली, ऐश्वर्या सनप ठाणे विजयी विरुद्ध सोनमिका पाटील जळगाव.
59 किलो गटातील तनया धुळे विजयी विरुद्ध प्रतिक्षा जामदार नागपूर शहर, अनुश्री बाबर सोलापूर विजयी विरुद्ध मोनिका कदम ठाणे, श्रद्धा कुंभार कोल्हापूर शहर विजयी विरुद्ध साक्षी पुणे शहर अशा कुस्त्या झाल्या.
Success Story: अपयशानंतर केला जोमानं अभ्यास, लातूरची मुलगी बनली थेट न्यायाधीश, पाहा Video
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य
यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झाली होती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेत पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार पुणे, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आयोजनासाठी चुरस होती. यात परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी बाजी मारत पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीला खेचून आणली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Sangli, Sangli news, Sports