धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 24 मार्च : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध करणं हे सोपं नाही. पण, पृथ्वी शॉनं वयाच्या 14 व्या वर्षीच 546 रनची ऐतिहासिक खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. हॅरिस शिल्ड स्पर्धेतील त्या खेळीनंतर पृथ्वीनं टीम इंडियापर्यंतचा प्रवास अगदी झपाट्यानं केला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यानं सेंच्युरी झळकावत टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार एन्ट्री केली. पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीला ब्रेक लागलाय. पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्यानं रन्स करतोय.
टी20 या क्रिकेटमधील सर्वात फास्ट आणि लोकप्रिय प्रकारात पृथ्वी स्पेशालिस्ट आहे. त्याच्या आक्रमक खेळामुळेच तो दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल टीमचा प्रमुख आधारस्तंभ बनलाय. यावर्षीच्या आयपीएल सिझनचं काऊंटडाऊन आता सुरू झालंय. दिल्लीला आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मुंबईकर पृथ्वीला मोठी जबाबादारी पार पाडावी लागणार आहे. पृथ्वी शॉचे शालेय क्रिकेटमधील कोच राजू पाठक यांनी लोकल 18 शी बोलताना पृथ्वीची आजवर कुणाला माहिती नसलेली गोष्ट सांगितलीय.
तापाने फणफणत असतानाही...
राजू पाठक यांनी पृथ्वीच्या शालेय क्रिकेटमधील आठवणी सांगितल्या आहेत. 'पृथ्वी शॉ तिसरीमध्ये त्यांच्याकडं प्रशिक्षणासाठी पहिल्यांदा आला. त्यावेळी तो विरारमध्ये राहत होता. त्याचे वडील विरारहून त्याला घेऊन येत असतं. पृथ्वीचा शाळेतील अभ्यास आणि क्रिकेटचा सराव या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ राखण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.
IPL 2023: बंगालचा आतापर्यंतचा सर्वात महागडा क्रिकेटर,दादापेक्षाही जास्त मिळाली किंमत!
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर अंजुमन विरुद्ध होणाऱ्या एका सामन्यासाठी रिझवीच्या टीममध्ये एकूण 18 खेळाडू होते. त्यापैकी 7 जणांची मुंबईच्या ट्रायलसाठी निवड झाली होती. हा सामना पुढं ढकलण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण, ते काही झालं नाही. आमच्यासाठी 'करो वा मरो' असलेल्या त्या सामन्याच्या आदल्या रात्री पृथ्वीला 103 डिग्री ताप होता.त्यानंतरही तो सकाळी मैदानावर उतरला.
आम्ही अंजूमनला पहिल्या इनिंगमध्ये 166 रनवर ऑल आऊट केले.त्याला उत्तर देताना पृथ्वीनं एकट्यानंच 167 रनची खेळी केली. त्याच्या दमदार खेळीमुळे आम्ही तो सामना सहज जिंकला. पृथ्वी शॉ हा पहिल्यापासून टॅलेंटेड खेळाडू होता. क्रिकेट खेळण्यासाठी समर्पण वृत्ती त्याच्यात होती. त्याला जास्तीत जास्त काळ मैदानावर राहयला आवडत असे.अंजुमन विरुद्धच्या मॅचमध्ये तापानं फणफणत असतानाही तो खेळाला हे विशेष होते,'अशी आठवण पाठक यांनी सांगितली आहे.
IPL 2023 : आयपीएल 2023च्या नियमांत मोठे बदल! संघांना होणार फायदा
पृथ्वीची आयपीएलमधील कामगिरी
पृथ्वी शॉने आजवर दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळताना 63 मॅचमध्ये 147.45 च्या स्ट्राईक रेटनं 1588 रन केले आहेत. यामध्ये 12 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. या सिझनमधील दिल्लीचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरसह पृथ्वी ओपनिंगला येणार आहे. नियमित कॅप्टन ऋषभ पंत अपघातामुळे हा सिझन खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीच्या बॅटींगची मोठी जबाबदारी पृथ्वीला पेलावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2023, Local18, Mumbai, Prithvi Shaw