ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 23 मार्च: जिद्द आणि चिकाटीने कठोर परिश्रम केले की यशाला गवसणी घालता येते. हेच लातूरमधील मयुरी कदम यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत 3 मार्कांनी संधी हुकली. मात्र, जिद्द न सोडता अभ्यास सुरूच ठेवला आणि 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्रातून सहावा क्रमांक पटकावत मयुरी कदम या न्यायाधीश झाल्या आहेत.
वडिलांकडूनच मिळाली प्रेरणा
मयुरी कदम या ज्येष्ठ विधीज्ञ व्यंकट कदम यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी न्यायव्यवस्थेशी संबंधितच होती. त्यामुळे लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे वकील आणि न्यायाधीश बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी घरातील लोकांकडूनही पाठिंबा मिळाला. त्या दिशेनेच वाटचाल सुरू केली.
वकिलीचे शिक्षण, पुण्यात प्रॅक्टीस
मयुरी यांनी लातूर येथील केशवराज विद्यालयामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दयानंद महाविद्यालय येथे महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला व तिथेच पदवी प्राप्त केली. वकिलीची सनद मिळाल्यानंतर लातूर व पुणे येथे वकिलीची सात वर्ष प्रॅक्टीस केली. त्यामुळे प्रदीर्घ अनुभवाचा फायदा न्यायाधीश परीक्षेसाठी फायदा झाला.
3 गुणांनी हुकली संधी
न्यायाधीश होण्याचे स्वप्न असल्याने त्या दिशेने प्रयत्न सुरू होते. मयुरी यांनी 2020 साली पहिल्यांदा न्यायाधीशाची परीक्षा दिली. मात्र, केवळ 3 मार्कांनी संधी हुकली. त्यानंतर त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरूच ठेवला. वडील न्यायाधीश तर पती वकील असल्याने दोन्ही कुटुंबांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे पुन्हा 2022 ची न्यायाधीश परीक्षा दिली. दुसऱ्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवत राज्यात सहावा क्रमांक पटकावला.
MPSC Success Story: मुलीनं पांग फेडलं! कारखान्यातील मजुराची लेक झाली क्लास वन अधिकारी! Video
योग्य न्यायासाठी कटिबद्ध राहणार
न्यायाधीश म्हणून काम करत असताना नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देणार आहे. योग्य तो न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. तसेच लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे न्यायाधीश मयुरी कदम यांनी सांगितले.
यशासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल
कोणतेही यश संपादन करावयाचे असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. तरच यशाचे शिखर गाठता येईल, असे न्यायाधीश मयुरी कदम सांगतात. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील मित्रपरिवार शिक्षक, प्राध्यापक तसेच सहकारी यांना दिलं आहे. या सर्वांनी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करून माझे मनोबल वाढवले. त्यामुळेच हे यश मला संपादित करता आल्याची भावना मयुरी कदम यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Justice, Latur, Local18, Success story