मुंबई, 27 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आज दुपारी समोर आली. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर आता रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला ईडी चौकशीबद्दल प्रसारमाध्यमांधून माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
"मी दिवसभर सृजन भजन स्पर्धेच्या नियोजनात होतो. मीडियाच्या माध्यमातून चौकशीचा मुद्दा कळला. या प्रकरणाच्या मला खोलात जावं लागेल. हे प्रकरण समजून घ्यावे लागेल. जे लोक माझ्याशी याबाबत संवाद साधतील त्यांना सहकार्य करणार", अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
"मी संचालक होतो हे कुणी सांगितले? काही कागद असतील तर तपासावे लागतील. मग मी बोलेल. यंत्रणेला यापूर्वी देखील सहकार्य केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी याआधी देखील मला बोलावलं आहे", अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
(मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जाताहेत : एकनाथ खडसे)
नेमकं प्रकरण काय?
ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. ते सध्या एका बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी आहेत.
काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते.
ग्रीन एकर्स प्रा.लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती.या तक्रारीवर ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झाला आहे. रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Rohit pawar