मुंबई, 25 जानेवारी : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झाला. 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. एकनाथ शिंदेंनी केलेल्या राजकीय सर्जिकल स्ट्राईकमुळे ठाकरेंना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्हही गमवावं लागलं आहे. एवढच नाही तर त्यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळही संपला आहे, पण फेरनेमणुकीबाबत अजूनही निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेले ठाकरे अडीच वर्षांपूर्वी जोडलेले मित्र सांभाळतानाच नवे मित्रही जोडत आहेत, पण यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती असतानाच ठाकरेंनी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीची घोषणा केली. शिवसेना-वंचितच्या या युतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे, त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं विधान ठाकरेंचं टेन्शन वाढवू शकतं.
राष्ट्रवादीचा फॉर्म्युला
शिवसेना-वंचित यांची युती होत असतानाच अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातून वंचितला जागा द्याव्यात असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली, तर शरद पवार यांनी आपल्याला या भानगडीत पडायचं नसल्याचं विधान केलं.
शरद पवारांचे नेत्यांना आदेश
दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्याशिवाय जिथे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथेदेखील तयारी करा, असे निर्देश शरद पवारांनी दिले आहेत.
महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप अन् काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना बहुतेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना व्हायचा, त्यामुळे जिकडे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तिकडे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. असं असतानाही शरद पवारांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची नजर शिवसेनेच्या मतदारसंघावर आहे का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रकाश आंबेडकरांचा यूटर्न?
शिवसेना-वंचित यूती होऊन 48 तास होत नाहीत तोच प्रकाश आंबेडकर यांनी यूटर्न घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असून महाविकासआघाडीसोबत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकासआघाडीसोबत युती करण्याची आपली इच्छा नसल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
काँग्रेसने मागितला प्रस्ताव
शिवसेना-वंचितच्या युतीनंतर काँग्रेसनेही सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे काय प्रस्ताव ठेवला याबाबत आम्हाला समजलं की आम्ही आमचा प्रस्ताव देऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
मागच्या काही दिवसांमधल्या या घटना बघितल्या तर एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता मित्रपक्षांनीच ठाकरेंना खिंडीत गाठलं का? याबाबत कुजबूज सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Prakash ambedkar, Sharad Pawar, Shivsena, Uddhav Thackeray