पुणे, 19 फेब्रुवारी: महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ज्या प्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्यामुळे लवकरच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगात काही देशांमध्ये कोरोनाच लसीकरण सुरु झालं आहे तर दुसरीकडे आता कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून येत आहेत. मागील काही आठवड्यांपासून अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून या वाढीची कारणं शोधण्याचा प्रयत्न झाला. पण या रुग्णवाढीला विषाणूचा नवा प्रकार (new strain of coronavirus) कारणीभूत नाही, हे स्पष्ट झालं आहे. अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. अमरावती, अकोला, सातारा, पुणे या जिल्ह्यांतील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये **(mutation of corona virus)**काही बदल झालेला आहे का? या संदर्भातही आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे . आतापर्यंत आरोग्य विभागाने अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुन्यांची पुण्याच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी केली. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी हा कुठलाही परदेशी कोरोना स्ट्रेन नाही हे स्पष्ट झालं आहे.
अवश्य वाचा - सावध रहा..! कोरोनाबाबतीत अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतून समोर आलं धक्कादायक वास्तव
पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.