मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा (Uddhav Thackeray Resigns) राजीनामा दिल्यानंतर गुरूवारी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजभवनात पोहोचल्यानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करून मोठा बॉम्ब फोडला. या सरकारमध्ये मी कोणताही मंत्री नसेन पण भाजपचे आमदार मंत्रिमंडळाची शपथ घेतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 2019 ला आम्ही एकत्र लढलो आणि 170 जागांवर विजय मिळवला, पण दुर्दैवाने त्यावेळी आमच्या मित्रांनी दुसऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबही आजन्म त्या माणसांबरोबर गेले नाहीत. ज्यांनी हिंदूत्व आणि सावरकरांना विरोध केला, त्यांच्याबरोबर हे गेले, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो, आरक्षण सराव विषय सोडवतील, असंही फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचं पत्र दिल्यानंतरही औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पास केला, पण हे अवैध आहे. कारण राज्यपालांच्या पत्रानंतर मंत्रिमंडळ बैठक घेता येत नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा हा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.